अमरावती - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असणाऱ्या गुरुकुंज-मोझरी येथे गुरूवारी भाजपच्या महाजनादेश यात्रेचा प्रारंभ झाला. एक लाखाहून अधिक कार्यकर्ते व भाजपचे राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक मंत्री या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, भविष्यात महाराष्ट्राची स्पर्धा देशातील राज्यांशी नाही तर परराष्ट्रांसोबत होईल. यासाठी महाराष्ट्राला संपन्न राज्य बनविण्यासाठी मला हा महाजनादेश हवा आहे. मला जनादेश द्या, असे आवाहन जनतेला केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील काही ठळक मुद्दे
- आज राज्यात दुष्काळ आहे, मात्र आपल्या पुढच्या पिढीला दुष्काळ पहावा लागणार नाही.
- येणाऱ्या काळात महाराष्ट्रात कोणत्याही समस्या राहणार नाहीत. सर्व महिला सुरक्षित असतील, युवकांच्या हातात रोजगार असेल.
- आमच्या सरकारने 50 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात दिले. मागच्या सरकारने 15 वर्षात केवळ 20 हजार कोटी रुपये दिले होते. आज शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी अनेक योजना आमच्या सरकार राबवत आहे.
- 2014 पर्यंत केवळ 50 लाख कुटुंबाकडे शौचालये होती, 60 लाख घरांत शौचालये नव्हती. आम्ही आज 5 वर्षात संपूर्ण महाराष्ट्र हागणदारीमुक्त केला आहे.
- 2014 मध्ये शिक्षणात 18 व्या क्रमांकावर असणारा महाराष्ट्र आज तिसऱ्या क्रमांकावर आला. येत्या काळात महाराष्ट्र शिक्षणात पहिल्या क्रमांकावर येईल. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र आज पहिल्या क्रमांकवर आहे. देशात सर्वाधिक रोजगार देणारे राज्य म्हणून महाराष्ट्र आघाडीवर असल्याचा केंद्राचा अहवाल आहे.
- महाराष्ट्र्रात आमचे सरकार आले, तेव्हा केवळ 3 लाख कुटुंबे बचत गटांशी जोडली होती. आम्ही 40 लाखाहून अधिक कुटुंबांना बचत गटांशी जोडून त्यांना रोजगार मिळवून दिला.
- ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून 30 हजार किलोमीटरचे रस्ते ग्रामीण भागात तयार केले. इतके मोठ्या प्रमाणात रस्ते देशात कुठेही झाले नाहीत, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रासाठी भरभरून देतात
पूर्वीचे मुख्यमंत्री दिल्लीला गेले की, हात हलवीत परत यायचे. मी दिल्लीला गेलो की, पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रासाठी भरभरून देतात. राज्यातील कोणत्याही व्यक्तीला प्रत्येक आजारावर उपचारासाठी आम्ही मदतीच्या मोठ्या योजना आणल्या. आज अनेकांना या योजनेमुळे जीवनदान मिळाले आहे. आज राष्ट्रसंतांच्या भूमीत उसळलेला जनसागर हा महाजनादेश असून आपण विकासाच्या दिशेने पुढे जाऊ, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.