अमरावती - मेळघाटात तीन वर्षांच्या बालकाला भूमक्याने चटके दिल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. चिमुकल्या बाळाला भूमक्याने नाही तर त्याच्या वडिलाच्या आजीने चटके दिले असल्याचा खुलासा बाळाच्या वडिलांनीच केला आहे. सद्या जखमी अवस्थेत असणाऱ्या त्या बळावर जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
तब्येत बरी नसल्याने केला अघोरी उपचार
मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या खटकवली गावात राजरत्न जमुनकार या तीन वर्षीय बालकाची तब्येत बरी नव्हती. त्यामुळे वडिलाच्या आजीने महिनाभरापूर्वी त्याच्या कानाला चटका दिला होता. त्यातही बाळाला बरं वाटत नसल्याने तिने बाळाच्या पोटावर चटके दिले. याप्रकारामुळे जखमी झालेल्या बालकाला गुरुवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाळाच्या पोटावर गावातील भूमका बाबाने चटके दिल्याची माहिती समोर आली होती. मात्र बाळाचे वडील रतन जमुनकार यांनी "माझा आईच्या आईने बाळावर उपचार करण्यासाठी चटके दिले" अशी माहिती 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
अतिदक्षता विभागात उपचार सुरू
पोटावर चटके दिल्याने जखमी असणाऱ्या बाळावर जिल्हा सामान्य रूग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. आज सकाळी जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मुंबईवरून येताच जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन बाळाची भेट घेतली. मेळघाटात असणाऱ्या अंधश्रद्धेविरोधात जनजागृती केली जाणार, असे यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.