अमरावती - संत गाडगे बाबा यांची आज (२० डिसेंबर) ६४वी पुण्यतिथी आहे. त्यांनी आयुष्यभर किर्तनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलनाचे व स्वतः झाडूने स्वच्छता करण्याचे काम केले. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्यभरात विविध सामाजिक कार्यक्रम राबवण्यात आले. अमरावतीमध्येही गाडगे बाबांच्या अनुयायांनी सकाळपासून कीर्तन व ग्रामस्वच्छता करून पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात केली. कोरोनेचे सर्व नियम पाळून साध्या पद्धतीने गाडगे बाबांची पुण्यतिथी साजरी होत आहे.
ठिकठिकाणी वस्त्र व अन्नदान -
राज्यातील कोरोनाचे सावट लक्षात घेता यंदा पुण्यतिथी महोत्सव साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला. त्याच पार्श्वभूमीवर आज गाडगे महाराज यांच्या अनुयायांकडून ग्रामस्वच्छता, अन्नदान व वस्त्रदान करण्यात आले.
गाडगेबाबांचा थोडक्यात जीवन परिचय -
गाडगेबाबांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ला शेणगाव (जि. अमरावती ) येथे झाला. त्यांचे मूळ नाव डेबूजी होते. मात्र, ते डोक्यावर फुटलेले गाडगे(लहान मडके) टोपीसारखे वापरत म्हणून त्यांना गाडगे महाराज असे नाव पडले. त्यांचे संसारत मन लागत नसल्याने त्यांनी घर सोडून तीर्थयात्रा करण्यास सुरुवात केली. समाजातील कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष लोकसेवेचे व लोकशिक्षणाचे व्रत स्वीकारले. स्वच्छता, प्रमाणिकपणा व भूतदया यावर त्यांचा विशेष भर होता. २० डिसेंबर १९५६ ला प्रवासादरम्यान त्यांचा अमरावतीजवळ मृत्यू झाला.