अमरावती - जिल्हा नियोजन समितीअंतर्गत महापालिकेच्या कोणत्या भागात कुठली कामे होणार आहेत याची माहिती सादर करावी? असा प्रश्न काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत डवरे यांनी विचारला असता, अमरावती महापालिकेच्या आमसभेत गदारोळ झाला. बसपच्या नगरसेवकाने कार्यक्रम पुस्तिका भिरकावून दिल्याने चांगलेच वातावरण पेटले होते.
सत्ताधारी भाजप माहिती दडवून ठेवत असल्याचा आरोप विरोधकांनी केला तर या विषयावर आयुक्तांनी आधीच स्पष्टीकरण दिले असल्याने चर्चा करण्यात अर्थ नाही अशी भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतल्याने सभागृहात गोंधळ निर्माण झाला.
जिल्हा नियोजन समितीद्वारे महापालिकेला विकास कामांसाठी मिळालेल्या ४ कोटींच्या आसपास असलेल्या कामांची यादी सादर करा. असे प्रशांत डवरे यांनी मागणी करताच सभागृह नेते सुनील काळे, माजी महापौर मिलिंद चिमटे, तुषार भारतीय, बाळासाहेब भुयार आणि रिपाइं आठवले गटाचे नेते प्रकाश बनसोड यांनी अवलोकनार्थ ठेवण्यात आलेल्या विषयावर चर्चा नको, अशी भूमिका घेतली. यावर प्रत्यूत्तर म्हणून विरोधीपक्ष नेते बबलू शेखावत आणि माजी महापौर विलास इंगोले यांनी आमच्या सदस्यांनी केवळ माहिती विचारली आहे, ती नियमाने त्यांना मिळायला हवी अशी मागणी केली. यावर सत्ताधारी सदस्यांनी प्रशांत डावरे हे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत त्यांनी समितीच्या बैठकीत या विषयावर विचारायला हवे अशी भुमिका घेतली. त्यानंतर डावरे म्हणाले, "महापालिकेचा सदस्य या नात्याने मला सभागृहात प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. नेमके कोणत्या प्रभागातील कामांचा समावेश यात आहे हे जाणून घ्यायचे आहे."
दरम्यान, "प्रशांत डवरे हे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य असल्याने त्यांनी तिकडे माहिती विचारा म्हणता हे ठीक आहे. मात्र, मी या सभागृहाचा सदस्य असल्याने मला नियोजन समितीच्या निधीतून अमरावती शहरात कोणती कामे होणार आहेत याची माहिती द्या?" असे विलास इंगोले यांनी विचारताच पुन्हा सत्ताधारी नगरसेवकांनी हे योग्य नाही, अशी भूमिका घेतली. प्रकाश बनसोड यांनी सभा स्थगित करण्याची मागणी करताच एमआयएमच्या नगरसेवकांनी त्यांना विरोध केला. सभागृहात जनतेच्या प्रश्नावर चर्चा होत नसल्याचे म्हणत बसपचे नगरसेवक बजाज यांनी कार्यक्रमपत्रिका भिरकावून सभात्याग केला. त्यानंतर विरोधी पक्ष नेता बबलू शेखावत बोलायला लागले. तेव्हा, सत्ताधारी नगरसेवकांनी सभा स्थगीत करण्याची मागणी केली आणि महापौर संजय नरवणे यांनी सभागृहाचे काम स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर केले.
दरम्यान आज सभागृहात घडलेल्या प्रकारचा बबलू शेखावत आणि प्रशांत डवरे यांनी निषेध नोंदविला असुन महापौर संजय नरवणे आणि सभागृह नेते सुनील काळे यांनी आज सभागृहाचे काम नियमानुसारच होते असे स्पष्ट केले आहे.