अमरावती - ख्रिसमस निमित्त आज अमरावती शहरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. अमरावती शहरात इरविन चौक स्थित होली क्रॉस शाळेच्या आवारात असणाऱ्या सर्वात मोठ्या कॅथलिक चर्चमध्ये शेकडो ख्रिस्ती बांधवांनी उपासना करून सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या.
मंगळवारी मध्यरात्री फटाक्यांची आतषबाजी करून येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. अमरावती शहरातील होली क्रॉस शाळेतील चर्च सह विभागीय आयुक्तालयाच्या लगत सेंट थॉमस शाळेतील चर्च, बियाणी चौक येथील चर्च, आणि अंबापेठ तसेच वडाळी चर्चमध्ये ख्रिसमसचा उत्साह आज पाहायला मिळाला. होलीक्रॉस शाळेतील चर्च परिसरात येशू ख्रिस्तांचा जन्मा संदर्भात विविध देखावे साकार करण्यात आले. ख्रिस्ती बांधवांनी चर्चमध्ये प्रार्थना केली. यावेळी संपूर्ण चर्च रोषणाई आणि फुलांनी सजविण्यात आला होता. ख्रिस्ती युवक-युवतींचा उत्साह विशेष असा पाहायला मिळाला. चर्च प्रमुख आणि ख्रिस्ती धर्मगुरू फादर अफ्शीन यांनी येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव सर्वत्र उत्साहात साजरा होत असून सर्वत्र सुख शांती नांदावी असा संदेश 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिला. बोलताना ख्रिसमस निमित्त तरुणांचा विशेष असा उत्साह चर्च परिसरात पाहायला मिळाला.