अमरावती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शुक्रवारी संत ज्ञानेश्वर भवन येथे भाजप-शिवसेना पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या संमेलनाला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आज बॉम्ब शोधक पथकाने कार्यक्रम परिसराची कसून तपासणी केली.
अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ आणि वाशिम या पाच जिल्ह्यातील भाजप आणि शिवसेनेचे खासदार, आमदार, जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख आणि इतर महत्वाचे पदाधिकारी या संमेलनात सहभागी होणार आहेत. या संमेलनात लोकसभा निवडणुकीत युतीच्या प्रचाराची भूमिका निश्चित केली जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत उद्योग मंत्री सुभाष देसाई येणार आहेत. या दौऱ्यासाठी मुख्यमंत्री आणि ठाकरे हे दोघेजण स्वतंत्र विमानाने अमरावती येणार आहेत. या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने संत ज्ञानेश्वर संस्कृती भवन आणि परिसराची तपासणी केली. या संमेलनाला दोन्ही पक्षाचे विविध नेते मंडळी हजर राहणार असून सुरक्षा व्यवस्था कडेकोट ठेवण्यात आली आहे.