अमरावती Amravati Accident : दुचाकींची समोरासमोर धडक होऊन घडलेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर, या अपघातात दोन जण गंभीर जखमी आहेत. सोमवारी रात्री चांदूरबाजार ते अमरावती मार्गावर हा अपघात घडलाय. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळीच चौघांचा मृत्यू : दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोन जण गंभीर जखमी झाले असून, यात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्यानं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हा अपघात 1 जानेवारी रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास चांदूरबाजार-अमरावती रस्त्यावर एका बारसमोर झालाय. या अपघातात सौरभ किशोर मसराम (वय. 22 रा. मासोद), शेख जुनेद शेख बिस्मिल्ला खान (वय. 21 रा. ताज नगर चांदूरबाजार), धीरज राजू टवलारे (वय. 20 रा. शेवती), शेख नसीम शेख हसन (वय. 40 रा. पिंपळपुरा, चांदूरबाजार) यांचा जागीच मृत्यू झालाय. तर या अपघातात शेख नजीर शेख हसन (वय. 55 रा. ताजनगर, चांदूरबाजार), ओम रवींद्र मसराम (वय. 20 रा. मासोद) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
दुचाकींची समोरासमोर धडक : सौरभ मसराम हा आपल्या दोन सहकाऱ्यांसह भैरववरून अमरावती मार्गानं मासोदला जात होता. तर, शेख जुनेद शेख बिस्मिल्ला खान दुचाकीनं दोन सहकाऱ्यांसह लग्नाच्या स्वागत समारंभातून अमरावतीवरून चांदूरबाजारकडं जात होते. त्यावेळी दोघांच्याही दुचाकींची समोरासमोर धडक झाली.
जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार : अपघाताची माहिती मिळताच चांदूरबाजारचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल निर्मळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना पोलिसांनी तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.
हेही वाचा -