अमरावती - अजंनागाव सुर्जी तालुक्यातील चार कापूस खरेदी केंद्र दर्यापूरला स्थलांतरीत करण्याचा निर्णय सरकराने घेतला होता. या निर्णयानुसार शासकीय कापूस नोंदणी अंजनगाव सुर्जीला, तर खरेदी दर्यापूरला होणार आहे. त्यामुळे कापूस खरेदी केंद्र अंजनगांव सुर्जीतच सूरू करण्यात यावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांतर्फे चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात सर्वाधिक कापूस उत्पादन होऊन सुद्धा या तालुक्याला कापूस खरेदी केंद्र नाकारणे, म्हणजे शेतकऱ्यांचा घोर अपमान आहे. ज्या तालुक्यात सर्वाधिक कापूस पिकतो, तेथे कापूस खरेदी केंद्र नाही; परंतु ज्या तालुक्यात कापूस कमी पिकतो, तेथे मात्र दोन-दोन कापूस खरेदी केंद्र उभारले असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
निवेदनाद्वारे केली होती कापूस खरेदी केंद्राची मागणी -
अंजनगाव ते दर्यापूर हे अंतर तीस किलोमीटरचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाहतूकीचा खर्च लागेल. कापूस खरेदीसाठी वारंवार चकरा माराव्या लागतील. या समस्यांचा विचार पणन मंत्र्यांनी करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कापूस खरेदी केंद्राची घोषणा झाल्यानंतर आम्ही निवेदनाद्वारे अंजनगावात कापूस खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी केली होती. परंतु त्यावेळी कोरडे आश्वासन त्यांनी आम्हाला दिले. आता जोपर्यंत कापूस खरेदी केंद्राची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरू राहील, असा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला आहे.