अमरावती - शहर आणि ग्रामीण भागात खेळांना महत्त्व प्राप्त व्हावे, यासाठी शिक्षणासाठी मिळणाऱ्या शिष्यवृत्ती आहेत मात्र, यासोबतच विविध स्तरांवर खेळणाऱ्या खेळाडूंना शिष्यवृत्ती देण्यात यावी, असे महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे. यासंदर्भात आज (शनिवारी) अमरावती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चर्चाही करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी माध्यमांना सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणाप्रमाणेच खेळांमध्ये प्राधान्य प्राप्त व्हावे, असे त्या म्हणाल्या.
मंत्री ठाकूर पुढे म्हणाले, आज झालेल्या बैठकीत ग्रामीण आणि शहरी भागातील विकासकामांचा विविध नावीन्यपूर्ण कामांचा अंतर्भाव जिल्हा नियोजनात करण्यात यावा आणि अधिकाधिक विकास कामे व्हावीत, यासाठी निधी वाढवून मिळण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच प्रशासनानेही गतिमान व्हावे, असे निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा वार्षिक योजनेत 2020-21 वर्षासाठी 219 कोटी 18 लाख रुपये प्राप्त होणार आहेत. बैठकीत अधिक अपेक्षित विकास कामे आणि अतिरिक्त निधी मागणीकरिता चर्चा झाल्याचेही त्या म्हणाल्या.
जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न कसा सोडवता येईल यासह विकास कामात येणाऱ्या विविध अडचणींबाबत सर्व सदस्यांची मते जाणून घेण्यात आली. मेळघाटच्या विकासासंदर्भात आजवर झालेल्या दुर्लक्षावर कशी मात करता येईल आणि मेळघाटचा विकास कसा साधता येईल यावरही बैठकीत चर्चा झाल्याचे पालकमंत्री म्हणाल्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम लवकरच मार्गी लावण्यासंदर्भात पाठपुरावा करण्यात येईल, असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे, आणि आमदार देवेंद्र भुयार उपस्थित होते.