अमरावती - शहरातील श्याम चौकातील स्टेट बँक ऑफ इंडियातील सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून अचानक गोळी सुटल्याने बँकेतील अस्थायी कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. सुरक्षारक्षक आणि संबंधित कर्मचारी शुक्रवारी सायंकाळी गप्पांमध्ये रंगले असताना हा प्रकार घडला. त्यामुळे बँक परिसरात खळबळ उडाली आहे.
उज्वल देशमुख, असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. उज्वल देशमुख हे अकोला मार्गावरील जयप्रभा कॉलनी येथील रहिवासी आहेत. ते एसबीआय बँकेत अस्थायी कर्मचारी म्हणून सेवा देतात. या बँकेत सुरक्षा रक्षक असणारे शरद महल्ले यांच्याशी उज्वल देशमुख यांची चांगली मैत्री आहे. दोघेही शुक्रवारी सायंकाळी बँकेच्या प्रवेशद्वारासमोर गप्पांमध्ये रंगले होते. त्यावेळी शरद महल्ले यांच्या हातातील बंदुकीतून अचानक गोळी सुटली. ही गोळी उज्वल देशमुख यांच्या मांडीला लागली. यामध्ये जखमी झालेल्या उज्वल देशमुख यांना त्वरित झेनीत रुग्णालयात हलवण्यात आले. येथे अतिदक्षता विभागात उज्वल देशमुख यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे हादरलेले शरद महल्ले यांनी स्वतः कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणी चौकशीसाठी शरद महल्ले यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात हलगर्जीपणा झाल्याचे पोलिसांचे मत असून पोलीस पुढील तपास करत आहेत.