अमरावती - शहरातील वडाळी परिसरात असणाऱ्या महादेव मंदिराला एका दानशूर व्यक्तीने अमरावती शहरालगत असणारी 92 एकर जमीन दान दिली. 1902 मध्ये मंदिराला दान देण्यात आलेल्या या जमिनीची किंमत अफाट झाली असताना शहरातील काही बिल्डरांचा या जमिनीवर डोळा आहे. राजकीय पाठबळ आणि प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून बिल्डर विविध भागात असणाऱ्या या जमिनी बळकाविण्याचा प्रयत्न करीत असताना मंदिराच्या विश्वस्थांनी मात्र मंदिराची जमीन वाचविण्यासाठी प्रामाणिक लढा उभारला आहे.
काय आहे प्रकरण -
वडाळी परिसरात प्राचीन काळापासून महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराला वडाळीतील व्यक्ती पांडुरंग तिडके यांनी 1902 मध्ये आपले राहते घर आणि 92 एकर जमीन दान दिली होती. यानंतर मंदिराची विश्वस्थ समिती स्थापन झाली. विश्वस्थांनी जमीन दाते पांडुरंग तिडके यांच्या मुलीला चोळी बांगडी म्हणून 92 एकर पैकी 20 एकर जमीन दिली. उर्वरित 72 एकर जमिनिपैकी विविध भागात असणारी एकूण 50 एकर जमीन ही एकूण पाच कुटुंबांना शेती करण्यासाठी देण्यात होती. ज्या कुटुंबियाना शेती वाहायला दिली. आज या जमिनीचे भाव आकाशाला भिडणारे आहे, असे असताना काही बिल्डर्सने या शेत वाहणाऱ्या कुटुंबातील तिसऱ्या पिढीकडून त्यांच्या कुळाचे नाव जमिनीच्या सातबाऱ्यांवर चढविण्यास मदत करून ही जमीन थेट त्यांच्याकडून खरेदी केली. मध्यंतरीच्या काळात मंदिरांच्या विश्वस्थांना हा प्रकार लक्षात आला नाही. आता विश्वस्थ मंडळ बदलतास मंदिराची जमीन बेकायदेशिर पणे बिल्डरच्या ताब्यात जात असल्याचे लक्षात येताच, मंदिराच्या विश्वस्थांनी कंबर कसली आहे. तसेच प्रशासनातील भ्रष्ट व्यवस्था बिल्डर लॉबीला बेकायदेशीर कामांसाठी कशी मदत करते, हे उजेडात आण्यासाठी सरसावली आहे.
पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनीही घेतली दाखल -
मंदिराच्या विश्वस्थांपैकी एक असणारे अमरावतीचे माजी महापौर अशोक डोंगरे यांनी बिल्डर आणि भ्रष्ट अधिकरी संगनमताने मंदिराची जमीम कशी हडपाण्याचा प्रयत्न करीत आहेत, याची माहिती पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या निदर्शनास आणून दिली. यशोमती ठाकूर यांनी या प्रकाराची दाखल घेत योग्य कारवाई व्हायला हवी आणि गैरप्रकार झाला असेल तर अधिकाऱ्यांवर कारवाई होईल, असा इशारा दिला असून यासंदर्भात 23 जानेवारीला अधिकाऱ्यांची बैठक बोलावली असल्याची माहिती अशोक डोंगरे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.
मंदिरासमोर कटोरा घेऊन बसा, आम्ही दान देऊ -
अमरावती शहरातील 92 एकर जमीन एखाद्या मंदिराला दान करणे, हे लहान सहन कार्य नाही. यासाठी फार मोठे काळीज हवे. पांडुरंड तिडके यांच्याकडे ते काळीज होते. आज या दान मिळाल्या जमिनीवर ज्यांचा डोळा आहे, ते बिल्डर आणि या बिल्डरला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांना ही जमीन हवी असेल, तर त्यांनी कटोरा घेऊन वडाळी येथील महादेव मंदिरासमोर बसावे, मंदिराचे विश्वस्थ ही जमीन त्यांना दान करण्याची आमची तयारी आहे. मात्र, गैरमार्गाने जमिनीवर डोळा ठेवत असाल, तर त्यांना ठेचण्यासही आम्ही कमी पडणार नाही, असा इशारा मंदिराचे विश्वस्थ आणि माजी महापौर अशोक डोंगरे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिला आहे.
हेही वाचा - अमरावती : वडाळीतील महादेव मंदिराच्या जमिनीवर बिल्डरांचा डोळा