अमरावती : अमरावती शहरातून जाणाऱ्या सुपर एक्सप्रेस हायवे लगत वडूरा शेत शिवारात एका नाल्याच्या काठावर एका युवतीचा मृतदेह आढळून आला तर एक युवक जखमी अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हे दोघेही शहरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी आहेत. प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्यावर स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
काय आहे घटना? : जिल्ह्यातील परतवाडा शहरातल्या काढली परिसरातील संजना वानखडे असे युवतीचे नाव आहे, तर परतवाडा येथील रहिवासी सोहम ढोले असे जखमी युवकाचे नाव आहे. ते दोघेही बडनेरा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात पहिल्या वर्षाला शिकत होते. मंगळवारी सायंकाळी संजना घराबाहेर पडली. यानंतर हे दोघे रात्री साडेदहाच्या सुमारास वडूरा गावाजवळून जाणाऱ्या एक्सप्रेस हायवे जवळ पोहोचले. बुधवारी पहाटेपर्यंत ते दोघेही तेथेच होते. पहाटेच्या सुमारास संजनाची हत्या करून सोहमने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
प्री प्लान मर्डरची शक्यता : संजना आपल्याला सोडून इतर कुणाकडे आकर्षित झाली असल्याचा संशय सोहमला आल्यामुळे त्याने तिला संपवण्याचा निर्णय घेतला. संजनाचा मर्डर करण्याचे त्याने आधीच ठरवले होते. संजनाने सोहमला आता आपण वेगळे होऊ असे सांगितल्यानंतर सोहम तिला सतत कॉल करायचा. या संपूर्ण प्रकारानंतर आज पहाटे सोहमने संजनाची हत्या करून स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
बडनेरा पोलिसांना कॉल आला : एक युवक आणि युवती वडूरा येथील एका शेतात नाल्याकाठी पडले असल्याचा कॉल बडनेरा पोलिसांना मंगळवारी सकाळी आला. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली असता तरुणीचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले तर युवक जखमी अवस्थेत आढळून आला. दोघांच्याही गळ्यावर धारदार शस्त्राचे घाव होते. या घटनेमुळे अमरावती शहरात खळबळ उडाली असून मृत युवतीच्या चुलत भावाच्या तक्रारीवरून जखमी युवकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी दिली आहे. युवतीच्या मैत्रिणसह अन्य संबंधितांचे बयान नोंदविले जात असून या प्रकरणाचा लवकरच उलगडा होईल, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा :