अमरावती - तिवसा ग्रामीण रुग्णालयातील प्रभारी अधीक्षक हे सोफ्यावर झोपून रुग्णांच्या एक्स-रेची पाहणी करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर या व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया आल्या होत्या. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे सोफ्यावर झोपून असल्याचे स्पष्टीकरण डॉक्टरांनी दिले. ज्या तरुणाने हा व्हिडिओ व्हायरल केला, त्या तरुणाने शनिवारी पोलीस ठाण्यामध्ये येत डॉक्टरांची माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकला आहे.
डॉ. पवन मालुसरे यांनी तिवसा पोलीस ठाण्यामध्ये व्हिडिओ काढणाऱ्या तरुणाविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी संबधित तरुणाला बोलावले असता त्याने पोलिसांची आणि डॉक्टरांची माफी मागितली. डॉ. मालुसरे हे आजारी असल्याने सोफ्यावर आराम करत होते, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक शामसुंदर निकम यांनी दिली. त्यामुळे मालुसरे यांच्या स्पष्टीकरणाला दुजोरा मिळाला आहे.
हेही वाचा - डॉक्टरने सोफ्यावर झोपूनच केली रुग्णाच्या एक्स-रे रिपोर्टची पाहणी!
डॉ. पवन मालुसरे हे तिवसा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात प्रभारी अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी दुपारी ते आपल्या कक्षात रुग्णांच्या एक्स-रेची तपासणी सोफ्यावर झोपून करत होते. त्याच वेळी एका तरुणाने डॉक्टरांचा हा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती.