अमरावती - बोलेरो पिकअप आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकी पेटली गेली. दुचाकी पेटल्याने दोन मुलांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी परतवाडा-अमरावती मार्गावरील टाकरखेडा पूर्णा येथे घडली. निवृत्त दिपक सोलव (वय १२), सार्थक अनंत वैद्य (वय १७) असे अपघातात मृत झालेल्या मुलांची नावे आहेत.
अचलपूर तालुक्यातील तळणीपूर्णा येथील निवासी निवृत्ती व सार्थक हे दोघे दुचाकीने (एमएच २७ सीके ७२७६) आसेगावकडे जात होते. विरुध्द दिशेने येणाऱ्या बोलेरो पिकअप (एमएच २७ बीएक्स ३८१२) ने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या जबर धडकेत दुचाकीने पेट घेतला, त्यामुळे दोन्ही मुले आगीत होरपळी गेली.
परिसरातील नागरिक आले धावून
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. या अपघात आगीमुळे दोघांनाही गंभीर दुखापत झाली होती. निवृत्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर सार्थकला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. आसेगाव पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. अपघातामुळे काहीवेळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.