अमरावती - ती सांगलीची आणि तो अमरावती जिल्ह्यातला. ती दहावीची विद्यार्थिनी आणि तो बारावीत शिकत होता. सहा वर्षांपूर्वी गोंदिया येथे आयोजित वक्तृत्व स्पर्धेत निमित्त दोघांची भेट झाली. या स्पर्धेत तिने म्हटलेले गाणे त्याला आवडले आणि तिला तो. दोघेही दृष्टिहीन असले तरी आपण लग्न करायचे हे त्यांचे स्वप्न होते. या लग्नाला तिच्या घरच्यांचा विरोध होता. मात्र, घरच्यांचा विरोध झुगारून तिने थेट सांगलीवरून अमरावती गाठले. जिल्ह्यातील माहुली गावात आज या दृष्टिहीन जोडप्याचा गावकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात विवाह ( Blind Couple Get Married ) झाला.
अंध प्रेमीयुगुल झाले विवाहबद्ध अशी आहे ही प्रेम कहाणी -अमरावती जिल्ह्यातील माहुली या गावातील रहिवासी असणारा राहुल बावणे हा 2016 मध्ये इयत्ता बारावीत असताना वकृत्व स्पर्धेसाठी गोंदियाला गेला होता. या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी नाशिक येथून आरती कांबळे ही सुद्धा आली होती. या स्पर्धेत आरतीने राहुलला पराभूत केले होते. असे असताना स्पर्धेच्या समारोपीय सोहळ्यात आरतीने म्हटलेले गाणे राहुलला फार आवडले आणि त्याने याबाबत तिला सांगितले. त्यावेळी दोघांचीही मैत्री झाली. भ्रमणध्वनीवरद्वारे त्यांच्यात संवाद सुरू झाला आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्या लग्नाला आरतीच्या वडिलांचा विरोध होता.
राहुलसाठी आरती सांगलीवरून आली पळून -राहुल सोबत लग्न करायचे नाही, असा वडिलांचा विरोध असल्याने तिला घराबाहेर पडायची परवानगी नव्हती. आपल्या घराण्यात कोणीही प्रेम विवाह केला नसल्याने आरतीलाही राहुल सोबत लग्न करण्यास तिच्या वडिलांनी नकार दिला होता. 15 दिवसांपूर्वी सांगलीला एक कार्यक्रम असल्याचे निमित्त करून आरती आपल्या चुलत बहिणीसोबत घराबाहेर पडली. एका स्पर्धेनिमित्त भेटण्यासाठी माझे शिक्षक येणार असल्याचे तिने चुलत बहिणीला सांगून घरी पाठवले आणि आरती थेट अमरावतीसाठी निघाली. एसटी बसचा संप असल्यामुळे खाजगी गाड्या बदलत ती अमरावतीच्या दिशेने निघाली. वाटेत तिला अमरावती शहरात राहणारा एक व्यक्ती मिळाला. त्याच्या मदतीने ती अमरावतीपर्यंत पोहोचली. अमरावती बस स्थानकावर पोहोचल्यावर आरतीने राहुलला अमरावतीत आल्याचे सांगितले. राहुल लगेच तिला घरी आणण्यासाठी अमरावती बस स्थानकावर पोहोचला. आरतीला राहुलने माहुली येथील आपल्या घरी आणले पंधरा दिवसांपासून त्यांच्या लग्नाची तयारी सुरू होती, आज दोघेही विवाहबद्ध झाले.
हेही वाचा - Maharashtra Assembly Winter Session 2021 : आजपासून राज्याचे हिवाळी अधिवेशन; 'हे' मुद्दे गाजण्याची शक्यता