अमरावती : चांदुर रेल्वे शहरातील मिलिंद नगर परिसरात राहणारा रमेश मेश्राम हा अघोरी पूजा करून पैशांचा पाऊस पाडू शकतो, असे सांगायचा. 15 ऑगस्टला सायंकाळी शिवनी येथील एका शेतात त्याने अघोरी पूजा मांडली होती. त्याच्यासमोर नागपूर येथील बाबुराव मेश्राम (45), अक्रम याकूब (23), कमलाकर चरपे (44), राजेश येसनसुरे (28) आणि मयूर मडगिलवार (26) हे पाच जण बसले होते. नागपूरवरून खास पैशांचा पाऊस पाडून घेण्यासाठी आलेल्या या पाचही जणांना अघोरी पूजेनंतर पैशांचा पाऊस पडेल, अशी अपेक्षा होती. मात्र बराचवेळ झाला तरी पाऊस पडला नाही, तेव्हा पाऊस का पडत नाही, असा सवाल त्यांनी मांत्रिकाला केला. यावेळी त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.
आरोपींनी केली मांत्रिकाला मारहाण : पैशांचा पाऊस पाडत नाही. या पूजेसाठी आमच्याकडून उकळलेले पैसे परत कर, अशी मागणी या पाच जणांनी रमेश मेश्राम याच्याकडे केली. यावेळी त्यांच्यावर रमेश मेश्राम याने जादूटोणा करण्याची भीती दाखवली. रमेश मेश्राम याचा अवतार पाहून ते पाचजण काहीवेळ घाबरले. रमेश मेश्राम याने काही करण्याआधीच आरोपींनी त्याला मारहाण केली. यावेळी हातात आलेले फावडे रमेश मेश्राम याच्या डोक्यात मारले. या मारहाणीत रमेश मेश्राम हा रक्तबंबाळ झाला. रमेश मेश्राम खाली कोसळताच पाचही जणांनी घटनास्थळावरून पळ काढला.
पोलीस तपास : मांत्रिक रमेश मेश्राम (वय 65) हा शिवनी येथील शेत शिवारात असणाऱ्या झोपडीमध्ये मृतावस्थेत आढळून आला होता. त्याचा मुलगा उज्वल याने चांदुर रेल्वे पोलीस ठाण्यात 15 ऑगस्टच्या रात्री याबाबत तक्रार दिली. चांदुर रेल्वे पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा छडा लावण्यास सुरुवात केली. रमेश मेश्राम हा पैशांचा पाऊस पाडून देतो, अशी बतावणी करीत असल्यामुळे त्याला मानणाऱ्या भक्तांची मोठी संख्या होती, असे पोलीस तपासात आढळून आले.
आरोपींनी दिली खुनाची कबुली : या प्रकरणी पोलिसांनी त्याच्या संपर्कात असणाऱ्या अनेकांची चौकशी केली. तसेच रमेश मेश्राम याचा मोबाईल तपासल्यावर नागपूर येथील पाचजण त्याला भेटायला आले होते, अशी माहिती मिळाली. लगेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर गाठून कमलाकर मेश्राम, अक्रम याकुबशहा, राजेश येसनसुरे, मयूर मडगिलवार, कमलाकर चरपे या पाचजणांना बुधवारी अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी खुनाची कबुली देखील दिली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांनी दिली.
पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा : शिवनी येथील रमेश मेश्राम हा पैशांचा पाऊस पडतो, अशी माहिती मिळाल्याने नागपूरच्या या पाचजणांनी रमेश मेश्राम यांच्याशी संपर्क साधला. पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा करावी लागते. त्यासाठी येणाऱ्या खर्चासाठी रमेशने या पाच जणांकडून पैसे घेतले होते. पैशांचा पाऊस पाडण्यासाठी यापूर्वी तीन ते चारवेळा अघोरी पूजा करण्यात आली. त्यासाठी पाचही आरोपी यापूर्वी देखील शिवनी शिवारात आले होते, अशी माहिती देखील किरण वानखडे यांनी दिली.
हेही वाचा :
- Mantrik Arrest Thane : अमावास्येच्या रात्री तरूणींवर अघोरी कृत्य करणाऱ्या दोन भोंदू मांत्रिकासह ७ जणांना अटक
- Fraudulent woman arrested Thane : अदृश्य आत्म्याची भीती दाखवून पंधरा लाखांच्यावर गंडा घालणाऱ्या भोंदू मांत्रिक महिलेला अटक
- Godman arrested Pune : मुलाला बरे करण्याच्या नावाखाली मांत्रिकाकडून मातेवर बलात्काराचा प्रयत्न