अमरावती - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकमधील क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री किरेन रिजीजू हे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे राष्ट्रीय क्रीडा शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त अमरावतीला आले होते. त्यांच्यासोबत भाजपचे जम्मूचे खासदार जुगल शर्मा उपस्थित होते. मात्र अमरावती शहर आणि जिल्ह्यातील भाजपचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यक्रमाला पाठ फिरविल्याचे चित्र पाहायला मिळाले. भाजप कार्यकर्त्यांच्या अनुपस्थितीमुळे भाजपातील केंद्रीय नेत्यांसमोर राणा दाम्पत्य मात्र हिरो ठरले.
केंद्रीय क्रीडाराज्यमंत्री किरेन रिजिजू आणि जम्मूचे खासदार जुगल शर्मा पहिल्यांदा अमरावतीत आले. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे काम पाहून ते भारावून गेलेत. या संपूर्ण सोहळ्यात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा त्यांच्यासोबत होते. किरेन रिजूजी हे पहिल्यांदा 2004 मध्ये खासदार झाले. त्यापूर्वी 1999 ते 2004 पर्यंत दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांची महाराष्ट्रात खादी मंडळ सदस्य म्हणून नियुक्ती केली असता सेवाग्रामला महिन्यातून दोन ते तीनवेळा ते यायचे. भाजपतील इतक्या मोठ्या उंचीचे व्यक्तिमत्व असणारे किरेन रिजिजू अमरावतीत महत्त्वाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करीत असताना स्थानिक भाजपातील मंडळींनी त्यांना कुठलेही महत्व दिले नसल्याचे चित्र कर्यक्रमस्थळी उमटले.
जिल्ह्याचे पालकमंत्र्यांसह सर्व आमदार मुंबईत विधानसभा निवडणुकीसंदर्भात आयोजित महत्त्वाच्या बैठकीत गेले होते. आमदारांना वगळले तर जिल्ह्यात केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला येण्याची तसदी नगरसेवक, जिल्हापरिषद सदस्य ते एखाद्या साधारण भाजप कार्यकर्त्यानेही घेतली नाही. गंमत म्हणजे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. दिनेश सुर्यवंशी हे युवकांच्या कल्पनेतील उद्योग वगैरे संदर्भात पत्रकार परिषदेच्या आयोजनात व्यग्र होते. शहर अध्यक्ष जयंत देहणकर हे केंद्रीय राज्यमंत्र्यांचे स्वागत कसे धोक्यात येईल यासाठी सर्व कार्यकर्त्यांना जमा करण्यात व्यग्र होते. कोणत्याही चिल्लर कामांचे मोठे फलक लावून जाहिरातबाजी करणाऱ्या भाजपने आज मात्र शहरात केंद्रीय राज्यमंत्री आहेत याची कुठेही वाच्यता देखील केली नाही.
शहर आणि जिल्हा भाजपच्या आपल्या केंद्रीय राज्यमंत्र्याप्रती उदासीनता पाहून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याने केंद्रीय क्रीडा राज्यमंत्र्यांचा संपूर्ण दौराच हायजॅक केला. स्वतः किरेन रिजिजू यांनी राणा दाम्पत्याची कार्यक्रमात भरभरून स्तुती करीत अमरावतीकरांनी नवनीत राणा यांच्या सारख्या तरुण आणि कामाच्या व्यक्तीला लोकसभेत पाठवल्याबद्दल अमरावतीतकरांची प्रशंसा केली. माझेच खाते नाही तर केंद्रातील सर्वच खात्यातून विकास कामे खेचून आणायची क्षमता नवनीत राणा यांची आहे. विदर्भातील नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा नवनीत राणा यांनी सांगितलेल्या कामांना नाही म्हणणार नाहीत, असे रिजिजू म्हणाले.
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील कार्यक्रमानंतर केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री किरेन रिजिजू आणि खासदार जुगल शर्मा यांनी राणा यांच्या दिल्ली पब्लिक स्कूलला भेट देऊन ग्रंथालयाचे उद्घाटन केले. यानंतर राजापेठ येथील भाजप कार्यालयात दोन्ही नेत्यांनी धावती भेट दिली. भाजपचे केंद्रीय पातळीवरील नेते अमरावतीत असताना भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आपल्या नेत्याच्या कार्यक्रमाप्रती उत्साह नसल्याने उलटसुलट चर्चांना पेव फुटले आहे.