अमरावती - वाढीव वीज बिला विरोधात भाजप कडून राज्यसरकार विरोधात राज्यभर तालाठोको व हल्लाबोल आंदोलन केले जात आहे. दरम्यान अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे आंदोलनात नारे देताना महाभकास विकास आघाडीचा विजय असो अशा घोषणा भाजप कार्यकर्त्यानी दिल्या.
महावितरण कंपनीने लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना अवास्तव विज बिल दिले. त्यानंतर वीज बिल माफी देऊ, वीजबिल सूट देऊ पासून १०० युनिट पर्यंत मोफत वीज देऊ अशी घोषणा ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केली होती, त्यामुळे ग्राहक सवलत मिळण्यासाठी वाट पाहू लागल. मात्र, ही घोषणा हवेत विरली. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जनतेत रोष असल्याने भाजपने आज अमरावती जिल्ह्यातील बडनेरा, मोर्शी व तिवसा येथे महावितरण कार्यालयांना कुलूप लावून हल्लाबोल आंदोलन केले. तिवसा येथील महावितरण कार्यालयाला कुलूप ठोकून भाजपने आंदोलन करत विज दरात सवलत देण्याची मागणी केली. यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या. दरम्यान सुरवातीला महाविकास आघाडी सरकार विरोधात घोषना देण्याऐवजी महाभकास विकास आघाडीचा विजय असो अशा घोषणा काही आंदोलकांनी दिल्याचे समोर आले आहे.