अमरावती : प्रहारचे संस्थापक अध्यक्ष व अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचा त्यांच्या मतदार संघातील चांदूर बाजार तालुका खरेदी विक्री संस्थेच्या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. यानंतर बच्चू कडू यांचे कट्टर विरोधक असणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांनी जल्लोष केला आहे. दरम्यान, काँग्रेसच्या ह्या जल्लोषात भाजपचे कार्यकर्ते देखील आपला झेंडा घेऊन नाचत आनंद साजरा करीत असल्याचा व्हिडिओ वायरल झाला आहे. बच्चू कडू यांच्या पराभवाचा आनंद काँग्रेससोबतच भाजपला झाल्याचे स्पष्ट करणाऱ्या या व्हायरल व्हिडिओची चर्चा सध्या संपूर्ण अमरावती जिल्ह्यात रंगली आहे.
बच्चू कडूंचा पराभव : सलग चौथ्यांदा अचलपूर विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे बच्चू कडू यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्रीपद असताना देखील त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंडखोरी करून शिंदे गटात सहभाग घेतला. यामुळे कडूंवर अचलपूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात ताशेरे ओढले जात आहेत. बच्चू कडू यांच्या विरोधात जनआक्रोश निर्माण झाला असतानाच चांदूरबाजार खरेदी विक्री संघाच्या 15 संचालकांकरिता 19 मार्च रोजी 15 संचालकांकरिता झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनलचे 15 संचालक निवडून आले. तर शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांच्या शेतकरी पॅनलचे केवळ तीनच संचालक विजयी झाले.
भाजपचा कडूंवर आरोप : चांदूरबाजार तालुका खरेदी विक्री संस्थेचा निकाल जाहीर होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात काँग्रेसचा झेंडा घेऊन आणि गुलाल उधळीत ढोल ताशांच्या नादात जल्लोष केला. या जल्लोषात भाजपचे कार्यकर्ते देखील भाजपचा झेंडा घेऊन सहभागी झालेत. बच्चू कडूंच्या विरोधात भाजप आणि काँग्रेस एकत्र आल्याचे चित्र चांदूरबाजार मध्ये दिसले असतानाच चांदूर बाजार येथील भाजपचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी बच्चू कडू हे आमदार म्हणून लोकांचे प्रश्न सोडविण्यास सपशेल अपयशी ठरले असल्याचा आरोप केला. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना बच्चू कडू यांनी चांदूरबाजार तालुक्यातील खरेदी-विक्री संघाची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. बच्चू कडू यांचा हा पराभव पाहता आता भविष्यात देखील बच्चू कडूंना पराभूतच व्हावे लागेल, असे देखील गोपाल तिरमारे यांनी म्हटले आहे.