अमरावती : यंदा अमरावती सह संपूर्ण विदर्भात मान्सून लांबला आहे. त्यामुळे माणसांसोबतच पक्षांची चिंता देखील वाढली आहे. मान्सूनचे आगमन उशिरा होत असल्याने पक्षांचा विणीचा काळ देखील लांबला आहे. पाऊस उशिरा होणार असल्यामुळे याचा परिणाम निसर्ग चक्रावर जाणवायला लागला आहे.
पक्षांना पावसाची प्रतीक्षा : सध्या विदर्भातील पक्षी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सुगरण, शिंपी, नवरंग मोर, टिटवी, चातक, कोतवाल, खंड्या, वेडा राघू, निळ्या शेपटीचा वेडा राघू, काश्मिरी नीलकंठ राखी धनेश, मलबारी सुतार, चंडोल, वटवट्या टिटवी अशा अनेक पक्षांचा हा वेणीचा काळ आहे. उन्हाळा संपत येताच हे सर्व पक्षी नेहमीप्रमाणे आपल्या जोडीदारासोबत घरटी बनवण्यास सुरुवात करतात. नव्या पिलांना जन्म देण्यासाठी मादी आणि नर पक्षाला भरपूर ऊर्जा लागते. तसेच अंडी दिल्यावर पिल्लांना पण भरपूर खाद्य भरवायचे असल्याने हे सर्वच पक्षी कामाला लागतात. मात्र अती उष्मा पिल्लांना सहन होत नाही तर काही पक्षांची अंडी कडाक्याच्या उन्हामुळे तग धरू शकत नाही. मात्र यावर्षी पाऊस लांबल्याने पक्षांना त्याचा त्रास होतो असल्याचे पक्षी तज्ञ यादव तरटे ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले.
विणीच्या हंगामासाठी बाहेरून येतात पक्षी : पल्लव पुष्पक कोतवाल नावाचा पक्षी मेळघाटच्या जंगलात दरवर्षीप्रमाणे खास विणीच्या हंगामासाठी दाखल झाला आहे. जंगलातील मऊ गवताचे तुकडे जमा करून हा पक्षी घरटे तयार करत आहे. जमिनीपासून अंदाजे 20 ते 25 फूट उंच झाडाच्या फांदीवर या पक्षाचे घरटे असते. उत्तर भारतातून नवरंग नावाचा पक्षी देखील मेळघाटसह अमरावती जिल्ह्यातील वडाळी पोरा जंगल तसेच वरुड, मोर्शी लगत असणाऱ्या सातपुडा पर्वत रांगेत आला आहे. हा पक्षी नदी किंवा नाल्याच्या ठिकाणी असणाऱ्या आडोशाच्या झाडाझुडपांमध्ये घरटी करण्यासाठी जागा शोधतो. हा पक्षी जून - जुलै महिन्यात एखाद्या कपाच्या आकाराचे घरटे तयार करून त्यात अंडी घालतो. पाऊस आला की फुलपाखरे, कोळी, नाकतोडे, बेडूक, मासे, गांडूळ यांची संख्या वाढते. यामुळे पक्षांना आणि त्यांच्या पिल्लांना पोटभर खायला मिळते. याचा अंदाज बांधूनच पक्षी घरटे बांधण्यासाठी खटाटोप करतात, असे यादव तरटे म्हणाले.
शेतीचे नियोजन पक्षांच्या वागणुकीवर अवलंबून : आता पाऊस येणार, शेतीच्या कामाला लागण्याची वेळ आली आहे, असा अंदाज शेतकऱ्यांना पक्षांच्या वागण्यावरून कळतो. कावळ्याने आपले घरटे किती उंचावर बांधले यावरून पाऊस किती येईल याचा अंदाज शेतकरी बांधत असतात. अनेक शेतकरी चातक पक्षाची आतुरतेने वाट पाहतात. चातक पक्षाचे आगमन होताच पाऊस येतोच असे शेतकऱ्यांना खात्री आहे. एकूणच संपूर्ण शेतीचे नियोजन हे पक्षांच्या वागणुकीवरच अवलंबून आहे, असे यादव तरटे म्हणाले.
हेही वाचा :