अमरावती- विदर्भात यावेळी उशीरा पाऊस पडल्याने खरिपाची पेरणी उशिरा होत आहे. असे असताना अमरावती जिल्ह्यातील कृषी मंत्री अनिल बोंडे यांच्या मतदारसंघातील राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आला. तसेच आज कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्या घराबाहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने भीक मांगो आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांना दिलेल्या कर्ज माफीची सुस्पष्टता नाही. कर्जमाफी मिळाली नाही, त्यामुळे बँका वेगवेगळे कारण सांगून शेतकऱ्यांचा घुमजाव करत आहेत. बँकानी पीक कर्ज देण्याचे प्रमाण हे अल्प असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. याच विरोधात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वाखाली कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या दारासमोर भीक मागो आंदोलन करण्यात आले.