अमरावती - गेल्या सतरा वर्षांपूर्वी रमेश साखरकर या ध्येय वेड्या शेतकऱ्याने या विद्यापीठाची स्थापना केली आहे. लोकांना विषमुक्त अन्न मिळावे, हा या विद्यापीठाचा उद्देश आहे. शेतकऱ्यांनी रसायन मुक्त शेती करून शरीरही विषमुक्त करावे यासाठी ते काम करत आहेत. याठिकाणी त्यांनी एकूण 270 प्रकारच्या देशी बियाणांचा संग्रह केला आहे. ते लोकांना घरीच परसबाग तयार करून विषमुक्त शेती करण्याचा संदेश देतात.
भिल्ली गावाची लोकसंख्या जेमतेम दीड हजार आहेत. या ठिकाणी गेल्या १७ वर्षांपासून साखरकर कृषिसंत म्हणून ओळखले जातात. त्यांनी गावात आदर्श बीजग्राम तयार केले आहे. यामध्ये डाळ, गहू, ज्वारी, आदी कडधान्य, वेल, भाजीपाला, मसाला, फळे, चारा अशा विविध बियाण्यांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. नवधान्य म्हणून मूग, तूर, उडीद, तीळ, मटकी, चवळी, भेंडी, ज्वारी, कापूस इ. अशा देशी बियाणांची साठवण रमेश साखरकर यांनी केली आहे.
रासायनिक खते, बियाणे टाकून शेतीची सुपीकता नष्ट होत आहे. म्हणून या शेतकऱ्याने देशी बियाणांवर भर दिला आहे. त्यांनी स्वत:ची 270 प्रकारच्या बियाणांची बीज बँक तयार केली आहे. अमरावती जिल्हासह नागपूर, वर्धा, अकोला, यवतमाळ व वाशिमसह मध्यप्रदेश व आंध्रप्रदेश या ठिकाणांहून या बियाणांना मागणी आहे. साखरकर हे तालुक्यातील अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी हे देशी बियाणे व भाजीपाला देतात.
या लोकबीज विद्यापीठाची प्रेरणा त्यांना त्यांच्या आई-वडिलांपासून लाभली आहे, असे ते सांगतात. त्यांच्या एका पंचसूत्री कार्यक्रमाच्या माध्यमातून ते लोकांना या देशी बियाणांचे महत्त्व पटवून देतात. रासायनिक शेती करताना शेतीची सुपीकता व निरनिराळ्या आजारांना सामोरे जाण्यापेक्षा विषमुक्त शेती करूनदेखील चांगले उत्पन्न होऊ शकते हे रमेश साखरकर यांनी केलेल्या कामातून दिसत आहे. त्यांचा आदर्श घेऊन शेती केल्यास नक्की शेती ही फायदेशीर राहील यात दुमत नाही.