अमरावती - खासदार होण्यासाठी मी खूप मेहनत केली आहे. कोणत्याही राजकीय नेत्यांच्या भरवशावर नव्हे तर माझ्या मतदारांच्या भरवशावर मी खासदार झाले. आता मला कुणी क्रिकेट खेळणे शिकवू नये, मला डोळे दाखवू नका, तुमच्या शिवाय मी खासदार होऊ शकते, असा टोला खासदार नवनीत राणा यांनी विरोधकांना लगावला. जिल्ह्यातील तिवसा येथे मोझरी विकास आराखडा अंतर्गत काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नातून क्रीडा संकुलाचे उद्घाटन क्रिकेटपटू केदार जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
हेही वाचा - गड किल्ल्यांना नखही लागू देणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण
तर डोळे काढण्याची धमक आमच्यातही आहे-
यावेळी बोलताना खासदार राणा यांनी नाव न घेता आमदार ठाकूर यांना चांगलेच टोले लगावले. त्या म्हणाल्या, जर तुम्ही आम्हाला डोळे दाखवत असाल तर डोळे काढण्याची आमचीही ताकद आहे. मी राजकारणी नव्हते. काही लोकांच्या कारणाने मी राजकारणात आले. राजकारण शिकून त्यांना उत्तर द्यावे लागते. आता मी मैदानात उतरले आहे, तर विरोधकांना उत्तरही दिले पाहिजे. तुम्ही एक षटकार मारला तर मी जास्त षटकार मारू शकते. चेहऱ्यावर राग दिसला नाही पाहिजे. तोंडात साखर असली पाहिजे, हे आता मोठ्यांनी शिकले पाहिजे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
हेही वाचा - डॉ. कोल्हेंनी किल्ल्यातल्या बाभळी आधी काढाव्या -पर्यटनमंत्री रावळ
मनात एक आणि चेहऱ्यावर दुसरेच ठेऊ नये असा सल्ला त्यांनी नाव न घेता विरोधकांना दिला. तसेच यशोमतीताई तुम्ही मला तोंड भरून वहिनी म्हणता तर मीही तुम्हाला तोंड भरून नणंद म्हणते, जर कुठे नणंदने चूक केली तर वहिनी तिला उभे राहून सांगू शकते, अशी मिश्कील टिप्पणीही खा. राणा यांनी केली.
हेही वाचा - छगन भुजबळांची राष्ट्रवादी कोअर कमिटीच्या बैठकीला उपस्थिती; शिवसेना प्रवेशाला पुर्णविराम
दरम्यान, नवनीत राणांनी केलेल्या या राजकीय षटकारांमुळे उपस्थित लोकांच्या भुवया चांगल्याच उंचावल्या होत्या. त्यामुळे क्रीडा संकुलाच्या उद्घाटनापेक्षा या राजकीय फटकेबाजीची जोरदार चर्चा कार्यक्रमात पसरली होती. तर खा. राणा यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे महिला खासदार आणि महिला आमदार यांच्यामधील अंतर्गत कलगीतुरा पुन्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले.