अमरावती - राज्य सरकार तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी महत्त्वाकांशी असलेला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग १ मेपासून सुरु करण्याची घोषणा खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती.परंतु ती हवेतच विरत असल्याचे दिसते आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुन्हा 'ब्रेक द चेन' यामुळे या समृद्धी महामार्गावर काम करणारे जवळपास ५० टक्के मजूर उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड अशा राज्यातली असल्याने मागील लॉकडाऊनमुळे झालेले हाल आता होऊ नये, म्हणून आधीच गावी परतले आहे. यामुळे या मार्गाच्या अनेक ठिकाणचे काम रखडले आहे आणि त्यामुळेच १ मेपासून नागपूर ते शिर्डी दरम्यान सुरू होणाऱ्या महामार्गाला ब्रेक लागल्याचे पहायला मिळत आहे.
समृद्धी महामार्गाच्या कामाची गती मंदावली नागपूर ते मुंबई ७०१ किलोमीटरचा हा महामार्ग आहे. या महामार्गामुळे राज्यातील ३६ जिल्ह्यापैकी २४ जिल्हे जोडले आहेत. तर इंटरचेंजच्या माध्यमातून १४ जिल्हे जोडले आहेत. यातील पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी ५२० किमीचा प्रवास १ मेला सुरू होणार होता. या महामार्गाची पाहणी ५ डिसेंबर २०२० रोजी खुद्द मुख्यमंत्र्यांनी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातमधून जाणार्या रस्त्यावर गाडीत बसून व गाडी चालवून पाहणी केली. या दरम्यान माध्यमांशी बोलताना त्यांनी विश्वासाने सांगितले होते की, १ मेपासून नागपूर ते शिर्डी पर्यंतचा प्रवास खुला केला जाणार आहे. परंतु कोरोनामुळे रस्त्याच्या अनेक ठिकाणचे पुलाचे कामकाज अजूनही अपुरे आहेत. समृद्धी महामार्गाचे काम पाहणाऱ्या अधिकाऱ्याने माहिती दिली आहे की, कोरोना काळात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागल्याने झारखंड, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश मधील मजूर गावी निघून गेले आहेत. त्यामुळे रस्त्याचे काम रखडले असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा-राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपाची जोरदार मुसंडी, समाधान आवताडे यांची विजयाकडे वाटचाल