अमरावती - आठ दिवसात शेतकऱ्याच्या खात्यात रक्कम वळती न केल्यास बँक व्यवस्थापकाची 'भाकड म्हशीवर बसवून, त्याची गावभर धिंड काढू' असा असा धमकीवजा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. अनुदानाची रक्कम कर्जात कपात केल्याने करजगावच्या सेंट्रल बँक व्यवस्थापकाची बच्चू कडू यांनी गुरुवारी झाडाझडती घेतली होती. 'मार खाणे की याद आ गई क्या' असे म्हणत त्या अधिकाऱ्याला त्यांनी चांगलेच धारेवर धरले होते.
प्रहार संघटनेचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू हे आक्रमक व आगळ्या वेगळ्या आंदोलनाने सतत चर्चेत असतात. सर्वसामान्य गोरगरीब व शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी त्यांनी विविध अनोखे आंदोलने केली आहेत. बच्चू कडू यांनी गुरुवारी आपल्या मतदारसंघातील एका शेतकऱ्याच्या खात्यातील अनुदानाची रक्कम कर्जामध्ये कपात केल्याचे कळले. त्यामुळे त्यांनी करजगावच्या सेंट्रल बँक व्यवस्थापकाची झाडाझडती घेतली होती.