अमरावती - ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा उजाडला तरी अद्याप कोरोनामुळे राज्यातील शाळा बंद आहेत. ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे. मात्र, सर्वांना त्याचा लाभ मिळत नसल्याची वस्तूस्थिती आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम कायम आहे. यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जानेवारी महिन्यात शाळा सुरू होतील, असे संकेत शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले आहेत.
कोरोनामुळे शाळा अद्यापही सुरू झाल्या नाहीत. अशा परिस्थितीत ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले. ऑनलाइन शिक्षण सुरू करण्याची काही गरज नव्हती. यातून शैक्षणिक विषमता निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिक्षण हे सार्वत्रिक असले पाहिजे, ते सर्वांना समान मिळाले पाहिजे. यातून गरीब आणि श्रीमंत अशी विषमता निर्माण होऊ नये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सोबत यासंदर्भात पाच ते सहा वेळा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका झाल्या आहेत, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी धोरण निश्चित झाले पाहिजे. सर्वांना १००टक्के शिक्षण मिळाले पाहिजे. उन्हाळ्याची सुट्टी रद्द करून जानेवारीपासून शाळा सुरू करण्यात याव्यात, अशी सूचना आपण मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचेही कडू यांनी सांगितले.