अमरावती - अगदी तारुण्यापासून ते आमदार होईपर्यंत बच्चू कडू यांना सातत्याने साथ देणाऱ्या एका निष्ठावंत कार्यकर्त्याचे चार वर्षांपूर्वी अकाली निधन झाले. त्यानंतर कार्यकर्त्याच्या कुटुंबाला त्याची उणीव भासू नये यासाठी बच्चू कडू त्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहिले. दरम्यान दोन दिवसांपूर्वी त्या कार्यकर्त्याच्या मुलीच्या विवाहात बच्चू कडू व पत्नी डॉ. नयना कडू यांनी आई वडिलांची भूमिका पार पाडली. त्या मुलीचे कन्यादान करुन नवदाम्पत्याला लग्नाची भेट म्हणून विमाही काढून दिला.
राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या खांद्याला खांदा लावून साथ देणारे प्रहारचे अचलपूरमधील निष्ठावंत कार्यकर्ते सुधीर डकरे यांचे २०१४ मध्ये अकाली निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पोरक्या झालेल्या डकरे कुटुंबाला कडू यांनी वेळोवेळी आधार दिला. याच दरम्यान सुधीर डकरे यांची मुलगी वैष्णवी डकरे हिचा साखरपुडा देऊरवाडा येथील अमोल दातार यांच्याशी ठरला.
लॉकडाऊनमुळे हा विवाहसोहळा दोनवेळा पुढे ढकलण्यात आला. दरम्यान अखेर रविवारी तिचा विवाहसोहळा प्रमिला डकरे यांच्या निवासस्थानी अगदी साध्या पद्धतीने पार पडला. वडील नसल्याचे दुःख असलेल्या वैष्णवीला बच्चू कडू यांनी वडिलांप्रमाणे आधार देऊन तिची सासरी पाठवणी केली. सोबतच कडू दाम्पत्याने तिचे कन्यादान करून समाजापुढे एक आदर्श घालून दिला.