अमरावती - आपल्या वादग्रस्त टि्वटमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रणौतला जर ग्रामपंचायत निवडणुकीत उभे केले. तर डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे एखाद्या अभिनेत्रीला हाताशी धरून भाजपने असे घाणेरडे राजकारण करू नये, अशी टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे.
मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर शिवसेना विरुद्ध कंगना असे चित्र आहे. कंगना दररोज नवनवे टि्वट करत शिवसेनावर टीकास्त्र सोडत आहेत. यातच राज्यात सरकार स्थापनेला शिवसेनेला पाठिंबा देणारे प्रहार पक्षाचे बच्चू कडू यांनी कंगना रणौतवर निशाणा साधला आहे.
एका अभिनेत्रीमूळे राज्यातील सरकार कोसळण्याचा प्रश्नच येत नाही. कारण, शिवसेनेचा वाघ तिथे बसला आहे. माध्यमांनी एखाद्या अभिनेत्रीला प्रसिद्धी देण्याची गरज नाही. कवडीचीही किंमत नसलेल्या कंगनाला ग्रामपंचायत निवडणुकीला उभे केले. तर डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहनार नाही, असे बच्चू कडू म्हणाले.
ज्या अभिनेत्रीचे कोणतेही सामाजिक कार्य नाही. अशा अभिनेत्रीला हाताशी धरून, जर भाजप घाणेरडे राजकारण करत असेल, तर ते चुकीचे आहे, असेही ते म्हणाले. यापूर्वीही त्यांनी कंगनावर टीका केली होती. 'आमच्यासाठी कंगनाचा विषय महत्वाचा नाही, तर शेतकऱ्यांचा विषय महत्वाचा आहे. माध्यमांनी कंगनाचा विषय बंद करावा, असे वक्तव्य राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले होते.