अमरावती - एका २० वर्षीय नराधमाने तीन वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी 11 वाजताच्या सुमारास चांदुर रेल्वे तालुक्यात घडली. काही तरुणांनी आरोपीच्या तावडीतून चिमुकलीची सुटका केली. किरण राजेंद्र वऱ्हाडे (वय २० रा. कळमजापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
अमरावतीच्या चांदूर रेल्वे तालुक्यातील एका गावामधील पिडीत चिमुकली आहे. ती आपल्या आई-वडिलांसह गुरुवारी सकाळी चांदूर रेल्वे शहरात आली होती. यावेळी तिच्याच गावातील आरोपी किरण वऱ्हाडे हा दुचाकी घेऊन शहरात आला. त्याला जुना बस थांब्याजवळ पिडीत मुलगी तिच्या आईसोबत दिसली. यावेळी त्यांना येथे उभे का आहे ? याबाबतची चौकशी आरोपीने केली. त्यावर पती कुठे तरी गेले असून आम्ही त्यांची वाट पाहत आहोत, असे मुलीच्या आईने त्याला सांगितले. त्यानंतर आपण त्यांना शोधून आणतो असे सांगत आरोपीने पीडित मुलीला गाडीवर बसवले. त्यानंतर आरोपी त्या चिमुकलीला थेट खडकपुरा ते चांदूरवाडी पांदन रस्त्यावरील जैन यांच्या शेताजवळ घेऊन गेला. त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, तिथून चाललेल्या तीन तरुणांना मुलीचा रडण्याचा आवाज आल्याने त्यांनी तिथे जाऊन बघितले. तरुणांच्या हा प्रकार लक्षात येताच आरोपीला रंगेहाथ पकडले. त्यावर आरोपीने त्यांच्यावर विळा मारला व मुलीला घेऊन निघून गेला. त्यानंतर मुलीला आईजवळ देऊन काहीच घडले नाही, असा बनाव करत गावात निघून गेला. परंतु, या घटनेचे वृत्त संपूर्ण चांदूर रेल्वे परिसरात पसरले. त्यामुळे काहींनी त्या नराधमास त्याच्या गावात जाऊन पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले.