अमरावती - जिल्ह्यातील नांदगाव पेठमधील बाळापुरे ले आउटमधील एका शेळ्यांच्या फार्ममध्ये पहाटे काही पिसाळलेल्या कुत्र्यांनी हैदोस घातला. यात तब्बल ११ बकऱ्या ठार झाल्या आहेत. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून घातपात केल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. दरवाज्याचे कुलूप तोडून कुत्र्यांना आतमध्ये सोडण्यात आले व सूडबुद्धीने हा प्रकार घडवल्याची तक्रार शेळी फार्मचे संचालक मयूर काकडे आणि योगेश ठवळी यांनी दिली आहे.
एक महिन्यांपूर्वीच सुरू केला होता शेळी फार्म
कर्ज घेऊन दोन मित्रांनी बाळापुरे ले आउटमध्ये स्वतःची जागा घेऊन एक महिन्यांपूर्वी शेळी फार्म सुरू केला. सध्या ११ बकऱ्या या फार्ममध्ये होत्या. शुक्रवारी रात्री ११ वाजता मयूर काकडे आणि योगेश ठवळी यांनी बकऱ्यांचा चारा-पाणी करून फार्मला कुलूप लावून घरी परतले. त्यानंतर पहाटे पाच वाजताच्या दरम्यान बकऱ्यांचा आरडाओरडा सुरू झाल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी घटनेबाबत संचालकांना माहिती दिली. महितीनंतर लगेचच संचालकांनी घटनास्थळी धाव घेतली, तेव्हा घटनास्थळी ११ बकऱ्या ठार झाल्याचे दिसून आले.
सूड भावनेतून घातपात केल्याचा संशय
घटनेबाबत नांदगाव पेठ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत बकऱ्यांचे शवविच्छेदन केले. व्यवसायातील प्रतिस्पर्धी किंवा अन्य कोणीतरी डाव साधण्याच्या हेतूने ही घटना घडविली असल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येते. पोलीस घटनेच्या मुळाशी जाऊन घातपाताबाबत तपास करीत आहेत. लाखो रुपयांचे कर्ज घेऊन दोन उमद्या तरुणांनी एका नव्या व्यवसायाला सुरुवात केली. मात्र, काही समाज कंटकांनी तरुणांना उद्ध्वस्त करण्याचा प्रकार केल्याने समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी संचालक मयूर काकडे व योगेश ठवळी यांनी केली आहे.