अमरावती - आपल्या मुलाने गळफास घेऊन केलेली आत्महत्या ही जादूटोणामुळे झाली असल्याच्या संशयातून एका बाप-लेकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना चांदुर बाजार तालुक्यातील सांभोरा गावात घडली. या प्रकरणी ब्राह्मणवाडा थडी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. सांभोरा येथील भिकाजी गजाम व सहदेव गजाम असे हत्या झालेल्या बाप व मुलाचे नाव आहे. या हत्या प्रकराणानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
महादेव कुमरे, यादव कुमरे ,संजय कुमरे, अक्षय कुमरे यांच्यासह एक अल्पवयीन अशी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींची नावे आहे. अमरावतीच्या चांदुर बाजार तालुक्यातील सांभोरा या गावात राहणाऱ्या विशाल यादव कुमरे या तरुणाने २३ जूनला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. परंतु ही आत्महत्या सहदेव गजाम व भिकाजी गजाम यांनी केलेल्या जादूटोण्यामूळे झाली असल्याचे आरोपींचे म्हणणे आहे.
आपल्या मुलाने आत्महत्या केल्याचा संशय आरोपी असलेले यादव कुमरे यांच्या मनात होता. त्याच अनुषंगाने मुलाच्या आत्महत्येचा वचपा काढण्यासाठी कुमरे कुटुंबानी मंगळवारी सायंकाळी एकत्र येऊन लोखंडी पाईप व लाकडी दांडकाने भिकाजी गजाम व सहदेव गजाम या बाप मुलावर हल्ला करून त्यांची निर्घृण हत्या केली. असे पोलिसांनी सांगितले आहे.
दरम्यान, पोलिसांनी या घटनेचा छडा लावत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. आता न्यायालयाने या आरोपींना 11 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.