अमरावती - कोरोनाची पहिली लाट वृद्धांसाठी जीवघेणी ठरली. तर दुसऱ्या लाटेत अनेक तरूणांना प्राण गमवावे लागले असताना आता जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे संकेत दिले आहे. पहिल्या दोन्ही लाटेत सुरक्षित असणाऱ्या बालकांवर तिसऱ्या लाटेत परिणाम होण्याची भीती आहे. हे नवे संकट पाहता महाराष्ट्र बालरोगतज्ज्ञ संघटना समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स सज्ज होत आहे. कोरोनाची तिसरी लाट आणि बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्स संदर्भात महाराष्ट्र बालरोगतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत पांढरीकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी खास संवाद साधून एकूण परिस्थितीची माहिती दिली.
आतापासून तयारीची गरज -
कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांवर परिणाम करणार, असा अनुमान व्यक्त केला जात आहे. त्यामुळे मुलांना लागणारे व्हेंटिलेटर्स, त्यांना लागणारे ऑक्सिजन या सगळ्या सोयी आपण तयार केल्या पाहिजे. मुलांसाठीचे अतिदक्षता विभाग (आयसीयू) तयार झाले पाहिजे. नवजात बालकांवर उपचाराचीही व्यवस्था करायला हवी. यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला असून आमची महाराष्ट्र बालरोगतज्ज्ञ संघटनेतील सर्व पाच हजार सदस्य शासनाच्या मदतीसाठी सक्रिय सहभाग घेणार असल्याचे डॉ. जयंत पांढरीकर म्हणाले.
हेही वाचा - पुणे महापालिका सीरममधून 25 लाख लस खरेदी करणार, अदर पूनावालांशी चर्चा सुरू
लहान मुलांसाठी लस नसल्याने भीती वाढली -
पहिल्या लाटेनंतर आलेल्या दुसऱ्या लाटेत अल्प प्रमाणात लहान मुलांमध्ये कोरोना संक्रमण झाले. आता तिसऱ्या लाटेत बालकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. कोरोना प्रतिबंधक लस लहान मुलांसाठी नसल्याने भीती वाढली असल्याचेही, डॉ. जयंत पंढरीकर म्हणाले.
10 हजार बालरोगतज्ज्ञांना प्रशिक्षण -
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने गठीत टास्क फोर्समध्ये राज्यातील सर्व खासगी बालरोग तज्ज्ञ, शासकीय बालरोग तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. ग्रामीण भागातील डॉक्टरांना सुद्धा उपचार पद्धती माहिती व्हावी, यासाठी येत्या दोन आठवड्यात आम्ही उपचार संबंधित प्रशिक्षण देण्याचे काम राज्यभर सुरू करतो आहे. यात एकूण 10 हजार बालरोग तज्ज्ञांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचेही डॉ. पंढरीकर यांनी सांगितले.
हेही वाचा - आधी लग्न कोंढाण्याचे... रुग्ण सेवेसाठी नागपुरातील डॉक्टर तरुणीने मोडले स्वतःचे लग्न