अमरावती : आषाढी एकादशी जवळ येऊन ठेपली असून, पायी दिंड्या पंढरपूरकडे रवाना होत आहेत. देशात विविध यात्रा तसेच तीर्थस्थळाच्या उत्सवात रेल्वे प्रशासन विशेष गाड्या सोडत असतात. महाराष्ट्रातही आषाढी एकादशीला हजारो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. विदर्भातून त्यासाठी रेल्वेचा पर्याय आहे. यासाठी आता विदर्भातील पांडुरंगाच्या भाविकांसाठी आषाढी एकादशी निमित्त तीन खास गाड्या आता धावणार आहेत.
खासदार अनिल बोंडे यांनी केली होती मागणी : विदर्भातील पंढरीच्या भक्तांसाठी आषाढी एकादशीनिमित्त नागपूर, अमरावती तसेच खामगाव येथून तीन स्पेशल गाड्या सोडाव्यात अशी विनंती खासदार अनिल बोंडे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पत्राद्वारे केली होती. खासदार अनिल बोंडे यांनी केलेली विनंती रेल्वेमंत्री तसेच रेल्वे राज्यमंत्री दोघांनीही तातडीने मान्य केली असून, विदर्भातील पांडुरंगाच्या भाविकांसाठी आषाढी एकादशी निमित्त तीन खास गाड्या आता धावणार आहेत.
25 ला धावणार स्पेशल ट्रेन : नागपूर, खामगाव रेल्वे स्थानकासह अमरावतीच्या नया अमरावती या रेल्वेस्थानकावरून 25 जूनला गाड्या पंढरपूरसाठी धावणार आहेत. 26 जूनला देखील या तिन्ही रेल्वे स्थानकावरून या स्पेशल गाड्या सुटतील. या स्पेशल गाडीद्वारे भाविक 28 जूनला पंढरपूरला पोहोचतील. विदर्भातील पंढरीच्या भाविकांसाठी ही स्पेशल ट्रेन उपलब्ध करून दिल्याबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्ण, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार अनिल बोंडे मानले आहे.
पांडुरंगाच्या दर्शनाला २५० बस सज्ज : अनेक विठ्ठलभक्त वारकऱ्यांना दिंडीने पंढरपूरला जाणे शक्य होत नाही. त्यामुळे आषाढी एकादशीपूर्वी बसने पंढरपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. या प्रवाशांना सुविधा उपलब्ध करण्यासाठी एसटी महामंडळाकडून दरवर्षी जादा बसचे नियोजन केले जाते. यावर्षीही आषाढी एकादशीचा उत्साह पाहता, महामंडळाच्या नांदेड विभागातून अडीचशे बसचे नियोजन केले आहे. नांदेड जिल्ह्यातून आषाढी वारीसाठी विशेष २५० गाड्या सोडण्यात येतील. विभाग नियंत्रकांनी ही माहिती दिली आहे. तसेच एखाद्या गावातून ५० जणांचा ग्रुप झाला, तर त्या गावातून पंढरपूरला विशेष गाडी सोडण्यात येणार आहे.
हेही वाचा -