अमरावती - चिकन खाल्याने कोरोना हा आजार होतो ही अफवा सोशल मीडियावर मोठया प्रमाणावर पसरल्यानंतर खवय्यांनी चिकन खाण्याकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे कुक्कुटपालन व्यावसायिकांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. जनजागृती करूनही चिकनचा खप घसरल्याने अमरावतीत कुक्कुटपालन व्यावसायिकांनी 10 रुपये किलो जिवंत कोंबडी आणि 80 किलो चिकन विकायला सुरवात केली. त्यानंतर आता या दुकानावर चिकन खरेदीला गर्दी वाढली आहे.
हेही वाचा - कोंबडी फक्त १० रुपये किलो; अफवांमुळे पोल्ट्री व्यवसायिकांवर आत्महत्या करण्याची वेळ
अमरावतीत कोंबडी फक्त दहा रुपये ही बातमी ईटीव्ही भाततने दाखवल्यानंतर प्रशासनाच्यावतीने चिकनमुळे कोरोना होत नाही, असे सांगण्यात आले. तसेच राज्यात चिकन फेस्टिवलचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती मंत्र्याकडून देण्यात आली. जिल्ह्यात हजारो शेतकरी पोल्ट्री व्यवसाय करतात. परंतू चिकनमुळे कोरोना होत असल्याच्या अफवा समाज माध्यमांवर पसरल्यामुळे चिकन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर धोक्यात आला. हीच बाब लक्षात घेता. कुक्कुटपालन व्यावसायिकांनी दहा रुपये किलो कोंबडी विकण्याची शक्कल लढवली. त्यानंतर आता चिकन दुकानांवर चिकन खवय्यांची गर्दी असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.