अमरावती - उत्तर प्रदेशमध्ये फिल्म इंडस्ट्री उभारण्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आज मुंबईमध्ये बॉलिवूडच्या लोकांना भेटणार आहेत. बॉलिवूड उत्तर प्रदेशला हलवून मुंबईचं महत्व कमी करण्याचा डाव असल्याचा आरोप होत असतानाच आता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनीदेखील जोरदार टीका केली आहे. या फिल्म इंडस्ट्रीला जन्म हा मराठी माणसाने दिलेला आहे आणि ही फिल्म इंडस्ट्री दुसरीकडे हलवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व महाराष्ट्राच्या मुळावर उठणाऱ्या लोकांपासून सावध होण्याची गरज असल्याची टीका शिवसेनेचे खासदार रविंद्र सावंत यांनी अमरावतीमध्ये केली.
भाजपला हे अभिप्रेत आहे का ?
मुंबईमधील फिल्म इंडस्ट्री दुसरीकडे नेण्याच्या मुद्यावर भाजपला काय अभिप्रेत आहे हे विचारावं लागेल. जर अशाप्रकारे ही माणसं महाराष्ट्रच्या मुळावर येत असतील तर योग्य नाही. महाराष्ट्रातील अनेक उद्योग दुसरीकडे नेण्यात आले आहेत. भाजपला महाराष्ट्राची बांधीलकी आहे की नाही असा प्रश्न खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.
हेही वाचा - फायजर बायोटेक : इंग्लंडमध्ये पुढील आठवड्यात लस होणार उपलब्ध
प्रगतीशील राज्य म्हणून महाराष्ट्रची गणना
आमच्या बंदरावरील आक्रमण हे वाढलेलं आहे. सर्व उद्योग, फायनान्शियल ऑफिस गुजरातमध्ये नेण्यात आले आहे. हेच तुम्हाला अपेक्षित आहे का? याचं उत्तरही भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी दिलं पाहिजे. प्रगतीशील राज्य म्हणून अशी गणना ही महाराष्ट्र राज्याची होते ते भाजपाला अपेक्षित नाही का असं ही खासदार सावंत म्हणाले..
हेही वाचा - दाऊद इब्राहिमच्या लोटेतील मालमत्तेचा लिलाव, ग्रामस्थ रविंद्र कातेंनी जिंकली बोली
नारायण राणे कुडमुड्या ज्योतिषी
महाविकास आघाडी सरकार जन्मल्यापासून हे अकरा दिवसात पडेल असे कोकणातील कुडमुड्या ज्योतिष सांगत होता. त्यानंतर हे सरकार सप्टेंबरमध्ये पडेल ऑक्टोबरमध्ये पडेल असे सांगत होते. परंतु आता या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले असून पुढील चार वर्षही हे सरकार अशाच प्रकारे काम करणार असल्याचं खासदार अरविंद सावंत म्हणाले.