अमरावती - मार्च महिन्यातच उन्हाचा पार वाढला असताना अमरावती शहरालगत असणाऱ्या वडाळी, पोहरा आणि चिरोडी जंगलात नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटले आहेत. अशा परिस्थितीत प्राण्यांची तहान भागवण्यासाठी वन विभागाकडून कृत्रिम पाणवठ्यांच्या निर्मितीवर भर दिला जात आहे.
एकमेकांना लागून असलेल्या वडाळी, पोहरा आणि चिरोडी या परिसरात घनदाट जंगल आहे. वडाळी वनवृत्तात ३ हजार ८०० हेक्टर वनक्षेत्र आहे. तर पोहरा वनवृत्तात ४ हजार ९०० आणि चिरोडीचा जंगल परिसर हा ४ हजार १०० हेक्टरमध्ये विस्तारला आहे. या जंगलात २० ते २५ बिबट, शेकडोच्या संख्येत चितळ, हरणं, जंगली डुक्कर, ससे आणि ४०० प्रजातींचे पक्षी आहेत.
या सर्व पक्षी प्राण्यांची तहान भागविण्यासाठी भवानी तलाव, फुटका तलाव आणि नागरी वसाहतीला लागून असणारा वडाळी तलाव हे पाण्याचे मुख्य स्रोत आहे. आज भवानी आणि फुटका तलाव कोरडे पडले असुन वडाळी तलावातील पाणीही आटण्याच्या मार्गावर आहे. पोहरा वनवृत्तात येणारे इंदला आणि भिवापुरकर तलाव हे प्राण्यांची तहान भागविन्यासाठी अद्यापही सक्षम आहेत. मात्र, इंदला तलाव आटला आहे.
वन्यप्राण्यांनी नागरी वसतीत जाऊ नये यासाठी वनविभागाने आधीच काळजी घेत जंगलात कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. या कृत्रिम पाणवठ्यात दररोज टँकरने पाणी टाकण्यात येते. वडाळीच्या जंगलात एक-दोन नैसर्गिक पाणवठे असून ३ ते ४ कृत्रिम पाणवठ्यांद्वारे पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पोहरा आणि चिरोडी वनवृत्तातही कृत्रिम पाणवठे प्राण्यांची तृष्णा भागवत आहेत.
या भागात आणखी कृत्रिम पाणवठे व्हावेत, असा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. यावर्षी गंभीर परिस्थिती लक्षात घेत लवकरच जंगलात नव्याने कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती केली जाणार असल्याची माहिती पोहरा वन वर्तुळ अधिकारी विनोद कोहळे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.