अमरावती : सहकार क्षेत्रात अतिशय महत्वपूर्ण समजल्या जाणारी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सहकार पॅनलचा दणदणीत विजय झाला. भाजप समर्थीत शेतकरी परिवर्तन पॅनलच्या एकाही उमेदवाराला आपले खाते उघडता आले नाही. एकूण १८ पैकी १८ ही जागांवर काँग्रेस महाविकास आघाडी सहकार पॅनलचे उमेदवार बहुमताने विजयी झाले.
भाजपचा उडाला धुव्वा : सर्वांचे लक्ष लागून असलेल्या तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीची येथील निवडणूक १८ जागेसाठी होती. त्यासाठी काँग्रेस व भाजप समर्थीत दोन पॅनल आमने-सामने होते. दोन्ही पॅनलचे एकूण ३८ उमेदवार रिंगणात उभे होते. त्यामध्ये सेवा सहकारी सोसायटी मतदार संघातून ११ संचालक निवडून द्यायचे होते. यात भाजपच्या उमेदवारांचा धुव्वा उडाला आहे.
तिवसा बाजार समितीवर एकहाती सत्ता : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार यशोमती ठाकूर यांच्या सहकार पॅनलने वर्चस्व कायम राखले आहे. यामध्ये १८ पैकी १८ ही संचालक निवडून येत ठाकूर यांनी सहकारातला दबदबा कायम राखला आहे. यामध्ये सोसायटी मतदारसंघात स्वप्नील केने, विनायक तसरे, विवेक देशमुख, जयकांत माहोरे, गजानन वानखडे, राजेश वेरूळकर, मनोज साबळे, मेघा गोहत्रे, वंदना पाटेकर, रवींद्र राऊत, मंगेश राठोड, ग्रामपंचायत मतदार संघात राजेंद्र मढवे, विशाल सावरकर, अशोक मनोहर, जितेंद्र बायस्कर, व्यापारी व अडते मतदार संघात कैलाश पनपालिया, तुळसीराम भोयर, हमाल व मापारी मतदार संघात मोहन चर्जन विजयी झाले आहेत. यशोमती ठाकूर व विजयी उमेदवारांची जल्लोषात रॅली काढण्यात आली. या निवडणुकीसाठी ८६८ मतदारांपैकी ८३६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ही टक्केवारी ९६.४२ आहे.
चंदुर रेल्वेतही काँग्रेसचे वर्चस्व : चांदुर रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण १८ संचालक पदासाठी निवडणूक पार पडली. यामध्ये काँग्रेसला 17 जागा तर भाजपला एक जागा मिळाली. जिल्हा परिषद हायस्कूलमधील मतदान केंद्रावर मतदान पार पडले. ३३९ तर ग्रामपंचायत मतदार संघात ३८७ व व्यापारी अडते मतदार संघात ८२ तसेच मापारी मतदार संघात ४६ असे एकूण ८८३ मतदानापैकी ८५४ मतदान झाले. एकून ९६.७१ टक्के मतदान झाले होते. बाजार समितीसाठी माजी आमदार विरेंद्र जगताप यांच्या नेतृत्त्वातील सहकार पॅनलचे १८ पैकी १७ संचालक विजयी झाल्याने वर्चस्व कायम राखले आहे. तर आमदार प्रताप अडसड यांच्या पॅनलचा एक संचालक विजयी झाला.
या उमेदवारांचा झाला विजय : सोसायटी सर्वसाधारण मतदार संघात अतुल चांडक, रवींद्र अशोक देशमुख, मंगेश श्रीधर धावडे, राजेंद्र श्रीराम राजनेकर, प्रभाकर गोविंद वाघ, रामेश्वर पंढरीनाथ वानखडे, रावसाहेब हरिनारायण शेळके, पूजा श्रीनिवास देशमुख, वर्षा प्रदीप वाघ, गणेश सीताराम आरेकर, वसंत अण्णा गाढवे, ग्रामपंचायत मतदार संघात तेजस हरिभाऊ भेंडे, हरिभाऊ वसंत गव, प्रशांत कोल्हे, व्यापारी अडते मतदार संघात सुभाष मूलचंद जालान, हमाल व्यापारी मतदार संघात सुरेश नामदेव जाधव विजयी झाले. तर ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघातून भाजपचे आशुतोष गुल्हाने एका मताने निवडून आले आहेत.
हेही वाचा - Gram Sevak abducted : पाच लाख दे नाहीतर खेळ खल्लास, ग्रामसेवकाचे सिनेस्टाईलने अपहरण