अमरावती - विदर्भातील जैन धर्मियांचे प्रमुख तीर्थस्थान असणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील भातकुली येथे रविवारी वार्षिक रथयात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला. दिवाळीनंतर येणाऱ्या पंचमीला श्री 1008 आदिनाथ स्वामी दिगंबर जैन संस्थानाद्वारे रथ यात्रा महोत्सवाच्या आयोजनाची परंपरा शंभर वर्षापासूनही अधिक काळापासून सुरू आहे.
हेही वाचा - बीसीसीआयच्या 'बॉस'ला क्लीन चीट
दिवाळीनंतर भातकुली येथे दरवर्षी वार्षिक यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. दोन दिवसांच्या या महोत्सवात अमरावती जिल्ह्यासह विदर्भ आणि संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातून जैन धर्मीय भाविक सहभागी होतात. या महोत्सवांतर्गत रविवारी भगवान श्री आदिनाथ स्वामी यांच्या उत्सव मूर्तीला रथात ठेऊन हा रथ संपूर्ण भातकुली परिसराची परिक्रमा करण्यात आली. यावेळी भाविकांनी हा रथ हाताने ओढला. रथ महोत्सवादरम्यान संपूर्ण गावात ग्रामस्थांनी सडा आणि रांगोळी टाकून रथावरस्वर श्री आदिनाथ स्वामींचे दर्शन घेतले.
हा महोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होतो. सायंकाळी रथ मंदिरात परतल्यावर पूजा केली जाते. या महोत्सवानिमित्त भंडारा महाप्रसाद भाविकांना वितरीत केला जातो. अमरावतीसह संपूर्ण विदर्भ आणि मुंबई, पुण्यापासून भाविक या उत्सवात सहभागी झालेत अशी माहिती श्री 1008 आदिनाथ स्वामी दिगंबर जैन संस्थांचे अध्यक्ष सतीश संगाई यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.