अमरावती - जिल्ह्यातील तिवसा येथे दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी सायंकाळी गाई, म्हशी यांचा पोळा भरतो. यात हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये एकमेकांच्या अंगावर फटाके फोडण्याची जीवघेणी परंपरा जोपासली जात आहे. यात जनावरांना देखील खेळवले जात असून त्यांना निर्दयीपणाची वागणूक देऊन परंपरेच्या नावाखाली त्यांना त्रास दिला जात आहे.
गावातील मुख्य चौकात मकाजी बुवाचे लहानसे मंदिर आहे. सोमवारी गावकऱ्यांनी आपल्या जनावरांना देवदर्शनासाठी येथे आणले व त्यांना तेथे खेवळवले. दरम्यान, या गोंगाटात फटाकेही फोडण्यात आले. ही आगळी वेगळी परंपरा असून ती पाहण्यासाठी अख्ख्या गावाने तिथे गर्दी केली होती. एका म्हशीवर 'आमचं ठरलं, तिवशात फक्त कमळच फुलणार' अशी घोषणा म्हशीच्या पाठीवर लिहण्यात आली होती. दरम्यान, जनावरांना स्पर्धेत उतरवणे, त्यांना निर्दयपणे वागणूक देणे, हे बेकायदेशीर आहे. मात्र, परंपरेच्या नावाखाली तिवसा वासियांनी या सर्व गोष्टींना बगल देत जनावरांना त्रास दिला आहे.