अमरावती - जिल्ह्यातील मोर्शी येथे बुधवारी मुसळधार पाऊस झाला होता. ५ तासात १४१ मि.मी पाऊस झाला. त्यामुळे दमयंती नदीला पूर आला. यामुळे शेकडो घरात पुराचे पाणी शिरले. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. या पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुबंईवरून मोर्शीला आलेले अमरावतीचे पालकमंत्री अनिल बोंडे यांना काही पूरग्रस्तांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
जिल्ह्यात बुधवारी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे दमयंती नदीला पूर आला होता. पुराच्या पाण्यात अनेक जणांचे संसार वाहून गेले होते. या घटनेत झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषीमंत्री व अमरावती जिल्हाचे पालकमंत्री अनिल बोंडे यांनी पाहणी दौरा केला. परंतु, काल प्रशासनाकडून जेवणाची व्यवस्था झाली नसल्याचा आरोप करत पूरग्रस्त नागरिकांमध्ये आणि पालकमंत्री अनिल बोंडे यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली.
स्थानिक नागरिकांनी अनिल बोंडे हे आमच्या भागात आलेच नसल्याचा आरोप केला आहे. व आमची घरे-दारे, कपडे साहित्य पुरात वाहून गेले, त्यामुळे आता आम्ही संसार करायचा कसा? हा सवाल स्थानिक नागरिकांनी केला आहे. काही ठराविक भागातच पालकमंत्री बोंडे यांनी पाहणी केली असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.