अमरावती - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे ज्या दिवशी जाहीर करतील की मीच सक्षम विरोधी पक्षनेता आहे त्या दिवशी आमच्या संपर्कात असलेल्या भाजपाच्या चाळीस आमदारांची यादी आमच्याकडे असेल तसेच भाजपाचे 40 आमदार हे आमच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शुक्रवारी केला होता. दरम्यान, बच्चू कडू यांनी केलेल्या या दाव्यावर भाजपाचे ४० आमदार आमच्या संपर्कात हे बच्चू कडूंना पडलेले स्वप्न असल्याची टीका माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी केली आहे.
हेही वाचा - अमरावतीत भाजपला आंदोलनासाठी दूध मिळेना; रिकामे कॅन घेऊन आंदोलन करण्याची वेळ
आमच्या संपर्कात असलेले 40 आमदार घेऊन त्यांना मातोश्रीवर क्वांरटाइन करावे, असा सल्लाही अनिल बोंडे यांनी दिला आहे. बच्चू कडू हे मोठे नेते झाले आहे. त्यामुळे कदाचित मोठे झाल्याचे त्यांना स्वप्न पडत असतील. त्यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे दुःख दिसत नाही. सत्तेच्या उबेमुळे त्यांना चांगली झोप लागली असून स्वप्नही पडत आहे. कदाचित त्यांना आता कॅबिनेट मंत्रिपद पाहिजे म्हणूनच असे त्यांनी वक्तव्य केले, असेही ते म्हणाले. बच्चू कडू हे आता सत्तेच्या अंथरुणाला खिळून पडले असून त्यांना आता शेतकऱ्यांचे प्रश्न दिसत नाही. कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. मात्र, दुधाच्या प्रश्नावर ते बोलायला तयार नाही. वाघ असलेले बच्चू कडू शेळी कसे झाले? असा प्रश्न लोकांना पडत आहे, अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली. दरम्यान हे सरकार पाडण्यात भाजपाला कुठलाही रस नसून अंतर्गत मतभेदानेच हे सरकार कोसळेल, अशी प्रतिक्रियाही अनिल बोंडे यांनी ईटीव्ही भारतसोबत बोलताना दिली.