अमरावती -जिल्ह्यातील टाकरखेडा मोरे येथील अंगणवाडीच्या मदतनीस कोकिळाबाई सुधाकर खंडोकार यांच्या राहत्या घराला अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.
शॉर्टसर्किटमुळे लागली आग
या आगीत पंचवीस हजार रुपये व महत्त्वाचे दस्तऐवजासह सर्व गृहउपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. कोकिळाबाई यांची आर्थिक परीस्थिती बेताचीच आहे. त्यामुळे गावातील नागरिकांनी कोकिळाबाईंना तातडीने रोख स्वरुपात मदत केली आहे. नायब तहसीलदार अनंत पोटदुखे, मंडळ अधिकारी बांडे, गटविकास अधिकारी केशव पवार, पंचायत समिती तसेच महसूल विभागाचे ग्रामसेवक यांनी कोकिळाबाई यांच्या जळालेल्या घराची पाहणी केली. महसूल विभागाकडून कोकिळाबाईंना पाच हजार रुपयाची मदत देण्यात आली.
आमदार बळवंत वानखडे यांच्याकडून मदत
कोकिळाबाई यांना घरकुल योजनेचा लाभ तत्काळ मिळणे शक्य नसल्याने वैयक्तिक मदतीचा भाग म्हणून आ. बळवंत वानखडे यांनी स्वतः घर बनवून देण्याचा शब्द दिला आहे. उद्यापासून (रविवार) घराच्या बांधकाम सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन वानखडे यांनी दिले आहे.