अमरावती - संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या परीक्षा मागील दोन वेळा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट असतानाच पुन्हा एकदा आज विद्यापीठाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झालेल्या परीक्षेसाठी बसलेल्या हजारो विद्यार्थ्यांचे लॉगिनच होत नसल्याचा आरोप परीक्षार्थींनी केला आहे.
दरम्यान, सायंकाळी ५ वाजेपर्यंतही अनेक विद्यार्थ्यांचे लॉग इन होत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांना येत असलेल्या अडचणी पाहून विद्यापीठाच्यावतीने ऑफलाईन परीक्षा संदर्भात आज एक परिपत्रक काढले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांना जवळपासच्या महाविद्यालयात जाऊन परीक्षा द्यावी लागली. त्यामुळे विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.