अमरावती - देशाचे राष्ट्रपिता कसे होते, ते राष्ट्रपिता का आहेत याची नव्यापिढीला माहिती करून देणारे धडे पहिलीपासून ते दहावी पर्यंतच्या पाठ्यपुस्तकातून काढून टाकण्यात आले. शिक्षणप्रणाली ही विशिष्ट विचारसरणीची होणे घातक आहे. ज्याप्रमाणे बापूंनी विदेशी साहित्यांची होळी केली, आता या बदलणाऱ्या वातावरणात तशीच पाठ्यपुस्तकांची होळी करण्याची वेळ आली असल्याचे विचार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी मांडले.
रविवारी अमरावतीत 'कस्तुरबा' या विषयावर व्याख्यान दिल्यानंतर सोमवारी तुषार गांधी यांनी अमरावतीतील काही मान्यवरांसोबत विविध विषयांवर चर्चा केली. यानंतर त्यांनी पाठयपुस्तकातून महात्मा गांधींना पूर्णतः बाहेर काढल्याबाबत 'ईटीव्ही भारत'शी बोलताना खंत व्यक्त केली.
आजच्या शिक्षण प्रणालीविरुद्ध आंदोलन छेडण्याची वेळ आली आहे. आज पाठ्यपुस्तकरहित शिक्षणाची गरज निर्माण झाली आहे. स्वतः महात्मा गांधी यांनी शिक्षण हे माणसाच्या हाताला रोजगार देणारे, मेंदूला विचार देणारे आणि हृदयात माणुसकी रुजविणारे असावे, अशी संकल्पना मांडली. त्यामुळे आज गांधीजींच्या विचारांप्रमाणे माणूस आणि राष्ट्र घडविणाऱ्या शिक्षणाची नितांत गरज असल्याचे तुषार गांधी म्हणाले.