अमरावती - सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी मागील ३५ पेक्षा जास्त तासांपासून सुरू आहे. या निवडणुकीत तब्बल २७ उमेदवार आपले भाग्य आजमावत आहेत. या निवडणुकीच्या रिंगणात आधीपासूनच चर्चेत असलेले अपक्ष उमेदवार शेखर भोयर आणि संगीता शिंदे या बाद झाल्या असून आता महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. श्रीकांत देशपांडे आणि अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांच्यात थेट लढत सुरू आहे. या दोघांच्या लढतीत किरण सरनाईक यांची आघाडी अद्यापही कायम आहे.
अमरावती शिक्षक मतदारसंघाचा इतिहास
शिवसेनेचे स्थानिक नेते प्रा. श्रीकांत देशपांडे यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष अॅड. अरुण शेळके यांचा मागील निवडणुकीत ४ हजार ९४२ मतांनी पराभव केला होता. गेल्या वेळी ‘नुटा’ आणि ‘विज्युक्टा’ या दोन प्रमुख संघटनांनी कोणत्याही उमेदवाराला समर्थन देण्याऐवजी मतदान करण्याचे आवाहन केले होते. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातील दुफळीने तत्कालीन आमदार वसंत खोटरे यांच्यासमोरील अडचणी वाढल्या होत्या. ‘नुटा’चे समर्थन मिळवण्यात ते यशस्वी होऊ शकले नव्हते. दुसरीकडे अरुण शेळके यांनी ‘सुक्टा’ आणि प्राचार्य फोरमसारख्या अनेक संघटनांचा पाठिंबा मिळवला खरा, पण शिवाजी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदावर असताना त्यांनी निवडणूक लढवणे हे अनेकांना रुचलेले नव्हते.
पण, या वेळी शिक्षक संघटनांच्या भूमिका दुय्यम ठरतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भाजप विरुद्ध शिवसेना (महाविकास आघाडी) असा सामना या वेळी रंगणार आहे असे बोलले जात असतानाच भाजपचे उमेदवार नितीन धांडे हे मात्र आता मतमोजणी प्रक्रियेतून बाद झाले आहेत. त्यामुळे आता मुख्य लढत ही विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे आणि अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांच्यात सुरू आहे.
१९८० पूर्वी अमरावती आणि नागपूर विभाग मिळून एक शिक्षक मतदारसंघ अस्तित्वात होता. त्या वेळी मराशिपचे गणपतराव वैद्य आणि त्यानंतर चिखलीचे नानासाहेब लंके यांना मतदारांनी संधी दिली होती. १९८३ मध्ये अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ अस्तित्वात आला. विमाशिचे बाबासाहेब सोमवंशी हे पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर १९९० मध्ये मराशिपने हा मतदारसंघ आपल्याकडे खेचला. त्या वेळी वसंतराव मालधुरे हे विजयी झाले. १९९६ मध्ये मराशिपचे दिवाकरराव पांडे आमदार झाले. त्यानंतर २००२ मध्ये विमाशिचे वसंतराव खोटरे विजयी झाले. य २००८ मध्ये वसंतराव खोटरे पुन्हा निवडून आले, पण त्यानंतर २०१४ मध्ये मूळचे शिवसैनिक असलेले श्रीकांत देशपांडे यांना मतदारांनी संधी दिली, हा इतिहास आहे.
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, लोकभारती, विज्युक्टा, शिक्षक महासंघ, शिक्षण संघर्ष संघटना, अमरावती विभागीय शिक्षक संघ, पश्चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र शिक्षक आघाडी, शिक्षक क्रांती संघटना, महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण महासंघ अशा अनेक संघटनांचे उमेदवार प्रचाराला लागले होते.