अमरावती - अंजनगाव सुर्जी येथील सीताबाई संगई प्राथमिक शाळेने 'पाणी वाचवा, स्वच्छता अभियान प्रदर्शनी' आयोजित केली आहे. लहानपणापासून विद्यार्थ्यांना पाण्याच्या बचतीचे महत्त्व समजावे व त्यांच्या अंगी स्वच्छतेची जाणीव निर्माण व्हावी, या हेतूने 16 जानेवारी ते 18 जानेवारीपर्यंत ही प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती.
हेही वाचा - केंद्र सरकारच्या धोरणांना विरोध; 24 जानेवारीला वंचित आघाडीकडून 'महाराष्ट्र बंद'ची हाक
या दर्शनीमध्ये वर्ग पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प, शेततळे, स्वच्छ भारत मिशन, सौंदर्य भारताचे, दिव्यांगासाठी डजबिन, जलशुद्धीकरण, यासह 131 प्रतिकृतीची मांडणी केली होती. यामध्ये एकूण 300 विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. या प्रदर्शनीच्या सादरीकरणातून पाणी वाचविण्याचा आणि स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.
प्रदर्शनी पाहण्याकरिता अंजनगाव तालुक्यातील विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक ,पालक तथा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांना नवीन प्रेरणा मिळत असल्याचे सीताबाई संगई प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अनिल जूनघरे यांनी सांगितले. पाणी वाचवा व स्वच्छता अभियान या प्रदर्शनामधून विद्यार्थ्यांना पाण्याबाबत आणि स्वच्छतेबाबतचे महत्व समजले, त्याचप्रमाणे समाजातसुद्धा एक चांगला संदेश या प्रदर्शनाच्या माध्यमातून गेला.
हेही वाचा - राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना मुख्यमंत्र्यांनी बांधले शिवबंधन