अमरावती - जिल्ह्यातील कुऱ्हा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काळाघोटा येथे सुरू असलेल्या अवैध गावठी दारूच्या भट्टीवर स्थानीक गुन्हे शाखेने धाड टाकली. यामध्ये पोलिसांनी 34 हजार रुपयांची गावठी दारू जप्त केली आहे.
कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसापासून काळाघोटा या गावात हात भट्टीवरची दारू काढत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत कालाघोटा पारधी बेड्यावर दारू काढत असताना मोठी कारवाई केली.
याप्रकरणी आरोपी विज्या भोसले, शरद वरमा पवार (दोन्ही रा. कलघोटा पारधी बेडा) हे गावालगत नाल्याशेजारी लोखंडी ड्रममध्ये चालू हातभट्टी लावून दारू गाळताणा मिळाले. यावेळी घटना स्थळावरून 1200 लिटर मोहाचा सडवा द्रावण (30,000 रूपये किंमतीची) , 40 लिटर गावठी हातभट्टी दारू (किंमत अंदाजे 4000 रू.) तसेच इतर साहित्य असा एकूण अंदाजे 34 हजार 110 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दारूचा सडवा व काही साहित्य जागेवरच नष्ट करण्यात आले. काही आरोपी घटनास्थळवरून फरार झाले आहेत. कुऱ्हा पोलिसांनी दोन्ही आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणचे प्रभारी अधिकारी एपीआय सूरज बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय नरेंद्र पेंदोर, अमित वानखडे, युवराज मानमोटे, अमित वानखेडे व चालक अरविंद लोहकरे यांच्या वतीने करण्यात आली.