अमरावती - पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी कपाशीचे बनावट बियाणं विक्री करणाऱ्या एका कृषी केंद्र संचालकासह दोन आरोपींना अटक केली होती. या तपासात मुख्य आरोपी रामेश्वर चांडक हा त्याच्या शेतात बनावट कपाशीचे बियाणं तयार करत असल्याचे समोर आले. तेव्हा पोलिसांनी चांडक यांच्या शेतातील कारखान्यावर छापा टाकला. यात बियाणे तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलीस आणि कृषी विभागाने संयुक्तरित्या केली.
खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकरी पेरणीसाठी बियाणं तसेच खताची खरेदी मोठ्या प्रमाणात करत आहे. अशात बनावट बियाणं तसेच खते विक्री होत असल्याचे समोर आले. तेव्हा पोलीस आणि कृषी विभागाने बनावट बियाणं विक्री करणाऱ्याविरोधात मोहिम आखली. त्यानुसार धामणगाव रेल्वे तालुक्यात, दत्तापूर पोलिसानी, गुरूवारी रात्री एक धडक कारवाई केली. त्यांनी या कारवाईत कृषी केंद्र संचालक रामेश्वर चांडक याच्या मालकीचे बनावट कपाशी बियाणाच्या १००० बॅगा जप्त केल्या. याची किंमत अंदाजे ९ लाख रुपये इतके असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच या कारवाईत पोलिसांनी चांडक याच्यासह अन्य दोघांना अटक केली.
या प्रकरणाच्या तपासात आरोपी चांडक हा त्याच्या कासारखेडा गावातील शेतात बनावट बियाणाची निर्मिती करत असल्याचे समोर आले. तेव्हा पोलिसांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह चांडक यांच्या कारखाण्यावर छापा टाकला. यात बनावट बियाणं तयार करण्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. दरम्यान, आरोपी रामेश्वर चांडक याच्या दुकानाचा परवाना रद्द करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
हेही वाचा - समृद्धी महामार्गात पुन्हा आणखी एक शेत गेले चोरीला; शेतकऱ्याचा जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव..
हेही वाचा - अमरावती : बडनेरा येथील कंपासपुरा कोरोनाचा नवा हॉटस्पॉट; जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी