अमरावती - शहरातील वडाळी परिसरात रविवारी रात्री फ्रेजारपुरा पोलिसांनी गावठी दारू विक्रीविरुद्ध धडक मोहीम राबवली. या कारवाईत 150 लिटर गावठी दारू नष्ट केली.
वडाळी हा परिसर अतिशय दाट वस्तीचा झोपडपट्टी परिसर आहे. येथील परिवारपुरा आणि शिखपुरा या भागात मोठ्या प्रमाणात गावठी दारू काढली आणि विकली जाते. या भागात दवाखाना चालविणारा एक डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर येताच या परिसरात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने या भागात अवैध गावठी दारूविरुद्ध रविवारी रात्री मोहीम राबवली. फ्रेजारपुराचे पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
कोरोनाबाधित डॉक्टरचा दवाखाना जिथे आहे त्या दवाखान्याच्या मागेच गावठी दारूचा मोठा साठा पोलिसांच्या हाती लागला. तसेच परिवारपुरा या भागात 90 लिटर दारू चक्क जमिनीत खड्डा करून साठविण्यात आल्याचे आढळून आले. पोलिसांनी ही सर्व दारू नष्ट केली. पोलिसांना ज्या घरातून दारू विक्री होते अशा व्यक्तींच्या घरी जाऊन झडती घेतली. या कारवाईत कोणालाही अटक करण्यात आली नाही.