अमरावती- खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी चांदुर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथील एका संत्रा बगीच्यात जाऊन तबल एक तास संत्रा पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्या. तसेच कृषी अधिकाऱ्यांकडून त्यांनी संत्रा गळतीची कारणे जाणून घेतली.
शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेत त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांच्या खात्यात मदत देण्याचे आदेश राणा यांनी दिले आहेत. संत्राच्या नुकसान भरपाईत शासनाकडून मिळणारी रक्कम कमी आहे. त्यामुळे कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्याकडे वाढीव मोबदल्याची मागणी देखील करणार असल्याचे यावेळी खासदार नवनीत राणा यांनी सांगितले.
विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून अमरावती जिल्ह्याला ओळख आहे. मात्र, सध्या संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कमी झालेल्या पावसामुळे विहरीची पाणी पातळी खोल गेली आहे. त्यामुळे हजारो हेक्टरवरील संत्रा झाडे यावर्षीच्या उन्हाळ्यात शेतकऱ्यांनी तोडून टाकली.
संत्र्यांच्या शिल्लक असलेल्या झाडांना मागील काही दिवसात झालेल्या संततधार पावसाने ग्रासले आहे. विविध रोगांचा प्रादुर्भाव संत्रा झाडांवर झाला आहे. जिल्ह्यातील संत्र्यांच्या बगीच्यांना मोठ्या प्रमाणावर गळती लागली असल्याने संत्रे जमिनीवर पडत आहेत. यामुळे अमरावतीतील मोर्शी, वरुड, चांदुर बाजार, तिवसा, धामणगाव रेल्वे भागातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.